पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्याविरोधातील खटल्याची सुनावणी त्यांच्या फार्महाऊसवर चालवण्याला पाकिस्तानातील उच्च न्यायालयाने गुरुवारी मंजुरी दिली. 
मुशर्रफ अध्यक्ष असताना २००७ मध्ये त्यांनी जाहीर केलेल्या आणीबाणीवेळी अनेक न्यायाधीशांना निलंबित करण्यात आले होते तसेच काही न्यायाधीशांना ताब्यातही घेण्यात आले होते. याविरोधातील खटल्याची सुनावणी मुशर्रफ यांच्या फार्महाऊसवर घेण्याला मंजुरी देण्यात आली. मुशर्रफ सध्या याच फार्महाऊसवर नजरकैदेत आहेत.
इस्लामाबादमधील उच्च न्यायालयाने दहशतवादविरोधी न्यायालयाचे न्यायाधीश कौसर अब्बास झैदी यांना चाक शहजादमधील मुशर्रफ यांच्या निवासस्थानी खटल्याची सुनावणी सुरू करण्याचे आदेश दिले. मुशर्रफ यांच्या जीवाला दहशतवादी संघटनांकडून असलेल्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.