गेल्या आठवडय़ात सुरक्षा यंत्रणांनी कर्नाटकमधील भटकळ येथून इंडियन मुजाहिद्दीनच्या तीन संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यापूर्वी स्थानिक मुस्लिमांना विश्वासात घेतले नाही, याबद्दल मुस्लीम संघटनांनी स्पष्टीकरण मागितले आहे.
पोलीस आणि नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (एनआयए) ८ जानेवारीला बंगळुरू आणि कर्नाटकच्या उत्तर कन्नड जिल्ह्य़ातील खटकळ येथून इंडियन मुजाहिद्दीनच्या तीन संशयित दहशतवाद्यांना अटक केली आणि मोठय़ा प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला. तसेच रियाझ अहमद या इंडियन मुजाहिद्दीनच्या संशयिताला शनिवारी रात्री मंगळुरूविमानतळावरून तो दुबईला जाण्याच्या तयारीत असताना पकडले होते.
यावर आक्षेप घेत मजलीस-ए-इस्लाह वा तनझीम या संस्थेने म्हटले आहे की, पोलिसांनी या कारवाईची आगाऊ माहिती स्थानिक मुस्लिमांना दिली नाही. जर पोलिसांना अटक केलेल्या व्यक्तींकडे स्फोटके आहेत हे माहीत होते, तर ते स्थानिकांना प्रथम सांगितले पाहिजे होते. पोलिसांनी स्फोटके म्हणून जी पिशवी जप्त केली त्यात नेमके काय होते ते उघडून दाखवले नाही. तसेच पोलीस संशयितांच्या खोलीत सात ते आठ तास राहिले होते, त्याबाबतही संशय व्यक्त केला जात आहे. मजलीस-ए-इस्लाह वा तनझीम ही संस्था याबाबत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना निवेदन देणार आहे.
दरम्यान, रियाझ अहमदचे वडील ख्वाजा सईदी यांनी दावा केला आहे की, त्यांचा मुलगा गेली १० वर्षे दुबईत काम करतो आणि तो निर्दोष आहे.