आसाममध्ये नुकतेच भाजपने सत्तासोपान गाठले असताना तेथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाळेतील मुस्लिम विद्यार्थी राज्यात अव्वल ठरला आहे. आसाममध्ये दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला असून, परीक्षेत सरफराज हुसैनने सर्वाधिक गुण मिळवले आहेत.

सरफराजने दहावीच्या परीक्षेत ६०० पैकी ५९० गुण मिळवले आहेत. सरफराजची इंजिनिअर होण्याची इच्छा आहे. आसाममधील शंकरदेव शिशु निकेतन शाळेचा सरफराज विद्यार्थी आहे. ही शाळा स्वयंसेवक संघाचा विद्या भारतीय यांच्याकडून चालविण्यात येते. परीक्षेत यश प्राप्त झाल्यानंतर सरफराज म्हणाला की, मी खूप आनंदी आहे. शंकरदेव शिशु निकेतन शाळेचा विद्यार्थी असल्याचा मला अभिमान आहे. माझ्या शाळेमुळेच मी अव्वल स्थान गाठू शकलो. शाळेत कधीच धार्मिक भेदभाव केला गेला नाही. गायत्रीमंत्रासह संस्कृतमधील प्रार्थना बोलतानाही मला काहीच अडचण येत नाही. इयत्ता नववीत संस्कृत विषयात पैकीच्या पैकी गुण मिळाले होते, असेही तो पुढे म्हणाला.

दरम्यान, आसाममध्ये यंदा ३ लाख ८० हजाराहून अधिक विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. यातील २ लाख ३९ हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.