अयोध्येत उभारण्यात येणाऱ्या भव्य राम मंदिरासाठी अनेकजण पुढाकार घेत असून आर्थिक मदत करत आहेत. देशभरातून लोक आपल्याला जमेल त्याप्रमाणे निधी देत असून आपलाही हातभार लागावा यासाठी प्रयत्न करत आहेत. राम मंदिराच्या निर्माण कार्यात मदत करत दान करणाऱ्यांमध्ये रोजंदारीवरील मजूर, छोटे व्यापारी यांच्यासारखे लोकही सहभागी आहेत. यामध्ये तामिळनाडूमधील एका मुस्लीम उद्योजकाचाही समावेश आहे, ज्याने राम मंदिरासाठी एक लाख रुपये दान केले आहेत.

राम मंदिरासाठी देशभरातून निधी गोळा केला जात असून जेव्हा स्वयंसेवक तामिळनाडूमधील उद्योजक हबीब यांच्याकडे पोहोचले तेव्हा त्यांनी १ लाखांचा चेक दिला. त्यांनी दिलेली ही रक्कम पाहून स्वयंसेवकांनाही आश्चर्याचा धक्का बसला.

“मुस्लीम आणि हिंदूंमध्ये जातीय सलोखा वाढवण्याचा माझा प्रयत्न आहे. आपण सर्व ईश्वराची मुलं आहोत. याच विश्वासासोबत मी ही रक्कम दान केली आहे.” असं हबीब यांनी सांगितलं आहे. काही लोक मुस्लिमांना हिंदू आणि देशविरोधी म्हणतात हे पाहून दुख: होतं अशी भावनाही यावेळी त्यांनी व्यक्त केली.

पुढे ते म्हणाले की, “चांगल्या कामासाठी मदत करण्यात काही चुकीचं नाही. मी इतर कोणत्याही मंदिरासाठी दान करत नाही, पण राम मंदिराचा मुद्दा वेगळा आहे. यामुळे अयोध्यातील दशकांपासून सुरु असलेला वाद संपला आहे”.