गुजरातमध्ये आयोजित करण्यात आलेल्या आंतरशालेय गीता पठणाच्या स्पर्धेमध्ये दोन मुस्लिम विद्यार्थिनींनी दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे. माहीनूर शेख (९) आणि सुहाना घानची अशी या विद्यार्थिनींची नावे आहेत. माहीनूर तिसऱ्या इयत्तेत तर सुहाना सातव्या इयत्तेत शिकत आहे. गीता जयंतीच्या निमित्ताने श्री अग्रेसन विद्या मंदिर या शाळेने अष्टदश श्लोकी गीता पठण स्पर्धेचे आयोजन केले होते.

माहीनूर आणि सुहाना या दोघींनी तालबद्ध आणि अचूक उच्चारांसह अवघ्या सहा मिनिटात १८ श्लोक म्हणून दाखवले. श्री अग्रेसन विद्या मंदिर विद्या भारती अखिल भारतीय शिक्षा संस्थेशी संबंधित आहे. ही संस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शैक्षणिक शाखा आहे. पहिली ते चौथीच्या गटामध्ये माहिनूरने दुसरा तर पाचवी ते आठवीच्या गटात सुहानाने दुसरा क्रमांक पटकावला.

गीता पठणाच्या या स्पर्धेत एकूण १२ मुले सहभागी झाली होती. त्यात तीन मुस्लिम मुलांचा समावेश होता. ही स्पर्धा आयोजित करण्याचे हे सलग तिसरे वर्ष आहे. सर्व धर्माची मुले या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. विजेते निवडण्यासाठी आम्ही बाहेरुन परीक्षक बोलावतो. स्पर्धकाने घेतलेला वेळ, उच्चार या आधारावर विजेत्याची निवड केली जाते असे शाळेचे विश्वस्त रमेश अग्रवाल यांनी सांगितले.

स्पर्धेतील पहिला येणाऱ्या विजेत्याला १ हजार रुपये, द्वितीय क्रमांकाला ७५० रुपये आणि तृतीय क्रमांकाला ५०० रुपये दिले जातात. तिन्ही विजेत्यांना प्रमाणपत्र आणि भगवत गीतेची प्रत देऊन सन्मानित केले जाते. गीता पठण हे अभ्याक्रमाचा भाग आहे. त्यामुळे हे श्लोक आम्ही शाळेत शिकलो. या श्लोकांचा पूर्ण अर्थ समजलेला नाही. पण ते धर्माच्या शिकवणीशी संबंधित आहेत. या स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळाल्याचा मला आनंद आहे असे माहीनूरने सांगितले. आपली मुलगी गीतेमधले श्लोक म्हणते त्यावर आपल्याला काहीही आक्षेप नाही असे माहीनूरची आई नजमाने सांगितले.