बीफ सूप पितानाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्याचा प्रकार एका मुस्लीम तरूणाला चांगलाच भोवला आहे. कारण हा फोटो पोस्ट केल्यानंतर २४ वर्षांच्या या तरुणाला मारहाण करण्यात आली आहे. पोलिसांनी शुक्रवारी या संदर्भातली माहिती दिली असून याप्रकरणी चौघांना अटक केल्याचेही स्पष्ट केले आहे. तामिळनाडूतील पोरावेचेरी या गावातल्या एका तरुणाने बीफ सूप पितानाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला त्यानंतर त्याला समूहाकडून मारहाण करण्यात आली. गुरुवारी उशिरा हा प्रकार घडला. ‘इंडिया टुडे’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

एका मुस्लीम तरुणाने बीफ सूप पितानाचा फोटो फेसबुकवर पोस्ट केला होता. या पदार्थाच्या चवीचेही वर्णन त्याने केले होते. ज्यावर काही जणांच्या टोळक्याने आक्षेप घेतला आणि या तरुणाला मारहाण केली. मोहम्मद फैसन असं या तरुणाचं नाव आहे. त्याच्यावर झालेल्या हल्ल्यात तो जखमी झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दिनेश कुमार, अगाथियन, गणेश कुमार आणि मोहन कुमार अशा चौघांना अटक केली आहे.

या हल्ल्यामागे जे कोणी आहेत त्यांना कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी आता होते आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये दलित बांधव आणि मुस्लीम बांधव यांच्यावर होणारे हल्ले वाढत आहेत असंही दिसून येतं आहे. याआधी झारखंडमध्ये एका मुस्लीम तरुणाला बाईक चोरीच्या संशयावरून २० ते २५ जणांच्या जमावाने मारहाण केली होती. तसेच त्याला जय श्रीरामचे नारे देण्याचीही सक्ती करण्यात आली होती. रुग्णालयात उपचार घेतानाच या तरुणाचा मृत्यू झाला. जून महिन्याच्या अखेरीस ही घटना घडली होती. या घटनेला महिनाही होत नाही तोच जमावाकडून मारहाण झाल्याची आणखी एक घटना समोर आली आहे.