ती हिंदू होती, तो मुस्लिम होता. कोलकाता विद्यापीठात शिक्षण घेत असताना दोघांची ओळख झाली. ओळखीचे रुपांतर पुढे प्रेमात झाले. १९९८ साली दोघांनी विशेष विवाह कायद्यातंर्गत लग्न केले. लग्नानंतर दोघांपैकी कोणीही धर्म बदलला नाही. आपल्या धार्मिक श्रद्धा कायम ठेवत दोघांनी सुखाने संसार केला. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार मागच्या आठवडयात पत्नीचा निवेदीता घातक रहमान यांचा शरीरातील अवयव निकामी झाल्यामुळे मृत्यू झाला. निवेदीता यांच्यावर दिल्लीतल्या निगम बोध घाट येथे हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले.

पण त्यानंतर या कुटुंबाला निवेदीता यांचा श्राद्धाचा विधी करता आलेला नाही. मंदिराने बुकिंग रद्द केल्यामुळे हा श्राद्धविधी संपन्न होऊ शकलेला नाही. आम्ही ६ ऑगस्टला चित्तरंजन पार्क काली मंदिर सोसायटीमध्ये तेराशे रुपये भरुन विधीसाठी बुकिंग केले होते. १२ ऑगस्टला हा विधी करायचा आहे. बुकिंग केल्यानंतर तासाभराने मला चित्तरंजन पार्क काली मंदिर सोसायटीमधून फोन आला. फोनवरुन बोलणारा माणूस सारखे माझे नाव विचारत होता. अखेर त्याने मला श्राद्धाचा विधी होऊ शकणार नाही असे सांगितले.

मी जेव्हा त्याला कारण विचारले तेव्हा त्याने तुम्ही का ते समजू शकता असे बंगाली भाषेत उत्तर दिले असे इम्तियाझूर रहमान यांनी सांगितले. इम्तियाझूर निवेदीता यांचे पती आहेत. फोन करणाऱ्याने मला डिपॉझिट केलेले पैसे पुन्हा घेऊन जाण्यास सांगितले. पण मी नकार दिला. मी माझ्या पत्नीच्या श्राद्धाच्या विधीसाठी ती रक्कम भरली आहे. तुम्ही ते पैसे तुमच्याकडे ठेऊ शकता असे मी त्याला सांगितले.बुकिंगची पावती इम्तियाझूर यांच्या मुलीच्या नावे आहे. इम्तियाझूर पश्चिम बंगालमध्ये सहाय्यक आयुक्तपदावर कार्यरत आहेत.

निवेदिता या कोलकातामधील शाळेत बंगाली आणि संस्कृत भाषा शिकवत होत्या. काली मंदिर सोसायटीच्या विश्वस्तांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले कि, आम्ही काली मंदिर सोसायटीचे विश्वस्त आहोत. दर दोनवर्षांनी विश्वस्त बदलत असतात. आम्ही हिंदू धर्माचे नियम बदलू शकत नाही. श्राद्धाला का नकार देण्यात आला? त्यामागे काय कारणे आहेत ? त्यामध्ये मी लक्ष घालीन असे आम्ही काली मंदिर सोसायटीचे अध्यक्ष अशीटावा भौमिक यांनी सांगितले.