राष्ट्रीय स्वंयसेवक संघ प्रणीत संघटना मुस्लिम राष्ट्रीय मंचने (एमआरएम) अयोध्येतील वादग्रस्त ठिकाणी राम मंदिर बनवण्याचे समर्थन केले आहे. गुरूवारी (दि.२०) लखनऊ येथे झालेल्या एका कार्यक्रमात एमआरएमचे संरक्षक इंद्रेश कुमार यांनी मंदिर निर्मितीचे आवाहन केले. बाबरी मशिदीचे नाव मुघल बादशाह बाबरच्या नावावर ठेवण्यात आले होते. एखाद्या धार्मिक स्थळाचे नाव एका व्यक्तीच्या नावावर ठेवणे योग्य नाही, असे मत इंद्रेश कुमार यांनी व्यक्त केले. ही प्रारंभी मशीद होती. ज्याचे नाव या मशिदीला देण्यात आली. ती व्यक्ती विदेशी आणि अत्याचारी होती, असेही ते म्हणाले.
इंद्रेश कुमार हे राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचेही सदस्य आहेत. या वेळी कार्यक्रमात सहभागी झालेल्या मुस्लिम मौलवींनीही अयोध्यामध्ये राम मंदिर उभारण्याचे समर्थन केले.

एमआरएमचे उत्तर प्रदेश प्रभारी इस्लाम अब्बास म्हणाले, न्यायालयाच्या बाहेर हे प्रकरण मिटवण्याचा सर्वोच्च न्यायालयाने सुचवलेला उपाय चांगला आहे. राम हे देशातील आस्थेचा एक केंद्रबिंदू आहे. हक्काने या आणि अयोध्येतील वाद संपुष्टात आणा, असे आवाहन त्यांनी केले. या वेळी विश्व हिंदू परिषदेचे नेते स्वामी चिन्मयानंदही उपस्थित होते. ते म्हणाले, भाजप नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशींचा मशीद पाडण्याचा कुठलाच हेतू नव्हता. त्यांच्याविरोधात राजकीय कारणांमुळे खटला दाखल करण्यात आल्याचे ते म्हणाले.
चिन्मयानंद म्हणाले, मला अडवाणी आणि जोशींच्या भूमिकेबाबत माहीत आहे. कारण आंदोलनावेळी पाच सदस्यीय उच्चाधिकारी समिती स्थापण्यात आली होती. मीही त्याचा सदस्य होतो. मशीद पाडण्याचा निर्णय कधीच घेण्यात आला नव्हता. यावर चर्चाही झाली नव्हती. मग त्यांच्याविरोधात खटला कसा काय दाखल केला जातो. मी राम जन्मभूमी संघर्ष समितीचा राष्ट्रीय संयोजक होतो. पण अडवाणी आणि जोशींवर खटला दाखल करण्यात आला आहे, असे ते म्हणाले.