गोमांस सेवन संशयावरुन मारहाणीत एकाचा मृत्यू

गोमांस सेवन केल्याबद्दल दादरी येथे एका मुस्लीम व्यक्तीला करण्यात आलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने त्या गावातील अन्य मुस्लीम भयभीत झाले असून त्यांनी बिशदा गावातून स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने या प्रकरणाचा सविस्तर तपशील राज्य सरकारकडून मागविला असून यापुढे असे प्रकार घडणार नाहीत याची काळजी घेण्याचे आदेश दिले आहेत.

सोमवारी घडलेल्या या घटनेनंतर या परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असतानाही दादरी परिसरात राहणाऱ्या जवळपास ५० मुस्लीम कुटुंबामध्ये अद्यापही भीतीचेच वातावरण आहे आणि त्यामुळेच त्यांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आहे.

गोमांस सेवन करीत असल्याच्या आरोपावरून अखलाख आणि त्याचा मुलगा दानिश यांना घरातून बाहेर काढून सुमारे २०० जणांच्या जमावाने त्यांना बेदम मारहाण केली. त्यामध्ये अखलाख मरण पावला असून दानिश गंभीर जखमी झाला आहे.

आमचे जीवन धोक्यात आहे त्यामुळे आम्ही येथून अन्यत्र जाण्याचा निर्णय घेतला आहे. भविष्यातही असे प्रकार घडू शकतात, ते घडणार नाहीत याची हमी कोण देणार, असे अखलाखचा मुलगा सरताज याने सांगितले. सरताज हा भारतीय हवाई दलातील कर्मचारी आहे. स्थिती अधिकच चिघळली तर आम्ही दिल्ली अथवा अन्य राज्यांमधील आमच्या नातेवाईकांकडे जाणार आहोत, असे रइसुद्दीन या अन्य एका नागरिकाने स्पष्ट केले. दरम्यान, स्थिती नियंत्रणाखाली असल्याचा दावा जिल्हा दंडाधकारी एन. पी. सिंह यांनी केला आहे.

 

दादरी मारहाणीतील मृत्यू हा ‘अपघात’ – महेश शर्मा

दादरी/नवी दिल्ली- गोमांस सेवन करण्याच्या आरोपावरून करण्यात आलेल्या मारहाणीत एका ५० वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. ती घटना ‘अपघात’ असल्याचे मत केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांनी व्यक्त केले आहे. या प्रकरणावरून उत्तर प्रदेशातील सत्तारूढ सपा आणि भाजपने एकमेकांना दूषणे दिली आहेत. या प्रकारानंतर सदर व्यक्तीच्या कुटुंबीयांना संरक्षण देण्यात आले असले, तरी यापुढेही हल्ले होतील अशा भीतीने सदर कुटुंबाने हे गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतला आहे. सदर प्रकरणाला राजकीय रंग न देता तो अपघात समजावा, असे महेश शर्मा म्हणाले. महेश शर्मा हे त्याच परिसरातील खासदार आहेत. गैरसमजातून हा प्रकार घडला असावा आणि दोषींवर कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले. दरम्यान, या प्रकारावरून सपा आणि भाजपने एकमेकांना दूषणे देण्यास सुरुवात केली आहे. विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप हिंसाचाराला चिथावणी देत असल्याचा आरोप सपाने केला आहे. तर उत्तर प्रदेशातील जंगल राजला सपा जबाबदार असल्याचा आरोप भाजपचे खासदार आदित्यनाथ यांनी केला आहे.