द्वारका पीठाच्या शंकराचार्याचे मत

मथुरा : तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत पुन्हा मांडण्याच्या केंद्र सरकारच्या हेतूवर द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी प्रशचिन्ह उपस्थित केले आहे. मुस्लिम महिलांना दिलासा द्यायचा असेल, तर या समाजात पहिली पत्नी जिवंत असताना दुसरा विवाह करणे हा गुन्हा ठरविण्याशिवाय दुसरा मार्ग नाही, असेही त्यांनी सांगितले.

गुरुवारी येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी सवाल केला की, पतीला तुरुंगात पाठविल्यावर त्याच्या पत्नीला आधारासाठी पैसा कोण पुरविल? त्यामुळे मुस्लिम समाजात पहिली पत्नी हयात असताना पतीने दुसरा विवाह करू नये यासाठी हिंदू कोड बिलाच्या धर्तीवर कायदा केला पाहिजे.

अयोध्येत राममंदिर उभारण्याच्या मुद्यावर भाजपकडून लोकांची दिशाभूल सुरू आहे, असा आरोपही स्वामी स्वरुपानंद यांनी केला. या प्रश्नावर अगदी सुरुवातीपासूनच भाजपकडून लोकांची दिशाभूल सुरू आहे. हे मंदिर बांधण्याचे काम फक्त आपणच करू शकतो, असा समज भाजपने पसरविला आहे, असे ते म्हणाले. केंद्रातील भाजप सरकार राम मंदिर बांधू शकत नाही. कारण तसे केल्यास तो खासदारांनी संसदेत घेतलेल्या धर्मनिरपेक्षतेच्या शपथेचा भंग ठरेल. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यावर केवळ धर्माचार्यच या मंदिराची उभारणी करू शकतील, असा दावा त्यांनी केला. बाबराने अयोध्येला कधीही भेट दिली नव्हती. त्यामुळे त्याने तेथे मशीद बांधण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही ते म्हणाले.