पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील मैत्रीचे नवे पर्व सुरु होत असतानाच भारताचा सर्वात जुना मित्र इराण मात्र नाराज झाल्याचे दिसते . इराणने काश्मीरचा मुद्दा उपस्थित करुन भारताला चिमटा काढला आहे. जगभरातील मुस्लिमांनी बहारिन, काश्मीर आणि येमेनमधील जनतेला अत्याचारी हुकूमशहांविरोधात साथ द्यावी असे आवाहन इराणमधील सर्वोच्च नेते अयातोल्ला अली खोमेनी यांनी केले आहे. खोमेनी यांच्या विधानामुळे भारत आणि इराणमधील संबंधांमध्ये कटूता आणखी वाढण्याची शक्यता आहे.

भारत आणि इराणमधील संबंधांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून कच्चा तेलाचा पुरवठा आणि नैसर्गिक वायू साठ्यांवरुन तणाव निर्माण झाला आहे. यात भर म्हणजे आता खोमेनी काश्मीरचा मुद्दा मांडून भारताची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. सोमवारी खोमेनी यांनी ट्विट करुन भारतावर निशाणा साधला. खोमेनी म्हणाले, बहारिन, काश्मीर आणि येमेनमधील मुस्लिमांच्या समर्थनार्थ सर्व मुस्लिमांनी पुढे येणे गरजेचे आहे. रमजानच्या काळात मुस्लिमांवर हल्ले करणाऱ्या या भागांमधील अत्याचारी हुकूमशहांना हद्दपार केले पाहिजे असे खोमेनी यांनी म्हटले आहे. बहारिन, येमेन आणि अन्य मुस्लिम राष्ट्रांमधील समस्यांनी अप्रत्यक्षपणे इस्लामचेही नुकसान होते. पॅलेस्टाईन हा इस्लामिक जगतामधील महत्त्वाचा मुद्दा असल्याचेही त्यांनी नमूद केले.

जगभरातील मुस्लिम राष्ट्रांनी एकत्र येण्याचे आवाहनही त्यांनी केले. पॅलेस्टाईनचा उल्लेख करत त्यांनी इस्त्रायलविरोधात जिहाद पुकारण्यावर भर दिला. शत्रू मुस्लिमांच्या जागेवर कब्जा करत असेल त्यासाठी जिहाद पुकारण्याची गरज असल्याचे इस्लाममध्ये म्हटले आहे. इस्त्रायलविरोधात लढणे हे प्रत्येक मुस्लिमांचे कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले.

इस्त्रायलसंदर्भात इराणने भूमिका मांडल्याने तर्कवितर्कही लढवले जात आहे. इस्त्रायलविरोधात अरब राष्ट्र हा संघर्ष मागे पडला आहे. इस्त्रायलविरोधात भाष्य करुन इराणने या भागातील देशांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे. खामेनी यांनी यापूर्वीदेखील काश्मीरचा उल्लेख अफगाणिस्तान आणि पाकिस्तानसारखा देश म्हणून केला होता. त्यावेळीदेखील भारताने खामेनी यांच्या विधानाचा विरोध दर्शवला होता. मोदी हे अमेरिका दौऱ्यावर होते. आगामी काळात ते इस्त्रायलचा दौरा करणार आहेत. याशिवाय अरब राष्ट्रांशीही मोदींनी संबंध सुधारण्यावर भर दिला आहे. या घडामोडींमुळे भारताचा जुना मित्र इराण दुरावत असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे.