‘मन की बात’मध्ये पंतप्रधानांची घोषणा; यंदा १३०० महिला हजला जाण्यास सज्ज

मुस्लिम महिलांना पुरुष पालकाशिवाय हज यात्रेला जाता येईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ‘मन की बात’ या मासिक कार्यक्रमात केली आहे. हा धागा पकडून लगेच पुढील वर्षी १३०० मुस्लिम महिलांना पुरूष सहकाऱ्याशिवाय हज यात्रेला पाठवण्यात येत आहे, असे केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी जाहीर केले. त्रिवार तलाक विरोधी विधेयकाच्या मंजुरीनंतर मुस्लिम महिलांच्या जोखडमुक्तीसाठी सरकारने उचललेले हे दुसरे मोठे पाऊल आहे.

पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या मन की बात कार्यक्रमात सांगितले की, मुस्लिम महिलांना पुरुष सहकारी बरोबर असल्याशिवाय हज यात्रेला जाता येणार नाही हा गेल्या अनेक वर्षांपासून अमलात असलेला निर्णय त्यांच्यावर अन्याय करणारा आहे. आता आमचे सरकार हा र्निबध काढून टाकत आहे. मुस्लिम महिला पुरुषाशिवाय हज यात्रेला जाऊ शकतील. अल्पसंख्याक मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयानुसार आता ४५ वयाच्या वरील मुस्लिम महिला पुरुष सहकाऱ्याशिवाय हज यात्रेला जाऊ शकतील. फक्त त्यांनी चार-चारच्या गटाने जावे. मुस्लिम महिलांची ही छोटीसी अडचण दूर करण्यात आनंदच आहे. त्याचा समाजात मोठा परिणाम अपेक्षित आहे. जेव्हा ही अट प्रथम ऐकली तेव्हा ती कुणी तयार केली असेल याचे आश्चर्यच वाटले. हा भेदभावच होता. स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षांनी ही स्थिती राहणे वाईट आहे. अनेक दशके या अटीमुळे मुस्लिम महिलांवर अन्याय झाला. आता त्या बंधनातून मुक्त आहेत. अनेक इस्लामी देशात असा कुठलाही र्निबध नाही त्यामुळे तो भारतात असण्याचे काही कारण नव्हते. आता केरळसह विविध भागांतील १३०० महिला या पुरूष सहकाऱ्याशिवाय हज यात्रेला जातील हे सांगताना आनंद वाटतो.  एकटय़ाने हज यात्रेला जाण्याचा अर्ज करणाऱ्या सर्व महिलांचे अर्ज मंजूर करण्याचा आदेश त्यांनी दिला. हज यात्रेसाठी सोडत पद्धत असते पण एकटय़ा महिलांना त्यातून सूट दिली जाईल व त्यांच्यासाठी वेगळा प्रवर्ग केला जाईल. महिलांच्या सक्षमीकरणानेच  भारताची प्रगती होणार आहे. त्यासाठी आमचे सततचे प्रयत्न आहेत.

ख्रिसमसचा संदर्भ घेत त्यांनी सांगितले की, येशू ख्रिस्तांनी सेवाभावाचा संदेश दिला. कुठलाही धर्म, जात, वंश, परंपरा, वर्ण असो सेवाभाव ही मानवी मूल्यातील सर्वोच्च ओळख आहे. गुरू गोविंदसिंगांनीही त्यांच्या जीवनात स्वार्थत्यागाचे धडे घालून दिले.

अभिरूप संसद अधिवेशने घ्या

  • नवसहस्रकातील ही मुले नवभारताचे आधारस्तंभ आहेत असे सांगून ते म्हणाले की, १५ ऑगस्टच्या आसपास नवी दिल्लीत अभिरूप संसद घेण्यात यावी. प्रत्येक जिल्ह्य़ातील तरूण प्रतिनिधी निवडून त्यांना संधी द्यावी. त्यांनी पुढच्या पाच वर्षांत नवभारताची जडणघडण कशी असावी यावर विचारमंथन करावे. प्रत्येक जिल्ह्य़ात अभिरूप संसद अधिवेशने ऑगस्ट महिन्यात आयोजित करावीत. नववर्षांत प्रत्येक भारतीयाने पुरोगामी भारतासाठी काहीतरी करण्याची प्रतिज्ञा करावी.
  • २०१८ या वर्षांत जगात ४ जानेवारी ते १० मार्च दरम्यान जागतिक स्वच्छता पाहणी मोहीम होणार आहे त्यात मूल्यमापन केले जाईल. यात शहरी भागांचा समावेश राहणार असून जगातील ४००० शहरातील ४० कोटी लोकसंख्या त्यात सहभागी असेल.

काश्मीरच्या अंजुम खट्टकचे कौतुक

  • काश्मीर प्रशासकीय परीक्षेत पहिला आलेला अंजुम बशीर खान खट्टक याची आतापर्यंतची वाटचाल प्रेरणादायी अशीच आहे. तो दहशतवादापासून दूर राहिला. परीक्षेत पहिला आला. दहशतवाद्यांनी १९९० मध्ये त्याचे वडिलोपार्जित घर पेटवून दिले होते. त्यामुळे अंजुम हताश झाला नाही. त्याने हिंसेचा मार्ग निवडला नाही तर लोकसेवेचा मार्ग निवडला.

२६ जानेवारी २०१८ या प्रजासत्ताकदिनी प्रथमच परदेशातील दहा प्रमुख पाहुणे असतील त्यामुळे यंदाचा प्रजासत्ताक दिन सर्वाच्या स्मृतीत राहील. आसियान देशांच्या सर्व नेत्यांना प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी निमंत्रित केले आहे. आसियानची आता ५० वर्षे पूर्ण झाली असून भारतातील त्याचा सहभाग पंचवीस वर्षांचा आहे. दहा देशांच्या नेत्यांनी प्रजासत्ताक दिनास उपस्थित राहणे हा अभिमानाचा क्षण आहे.  – नरेंद्र मोदी, पंतप्रधान