उत्तर प्रदेशात गाय चोरी केल्याच्या संशयावरुन २२ वर्षीय तरुणाची माहराण करत हत्या करण्यात आली आहे. तरुण दुबईत वास्तव्यास असून कुटुंबियांना भेटण्यासाठी घरी आला होता. मंगळवारी रात्री ही घटना घडली. बरेली जिल्ह्यातील भोलापूर हिंदोलिया गावात ही घटना घडली आहे. गावकऱ्यांनी पोलिसांना फोन करुन शाहरुख खान आणि त्याचे तीन मित्र गाय चोरी करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती दिली होती.

पोलिसांनी तरुणाला जिल्हा रुग्णालयात दाखल केलं असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ‘गावकऱ्यांनी आम्हाला घटनेची माहिती दिली. आम्ही तरुणाला रुग्णालयात नेलं होतं. त्याने मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांचं सेवन केलं असल्याचं दिसत होतं’, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

मात्र पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये तरुणाच्या मृत्यू लिव्हर आणि किडनीला झालेल्या जखमांमुळे झाल्याचं समोर आलं आहे. हा मॉब लिंचिंगचा प्रकार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. ‘रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास गाय चोरी करण्याच्या हेतूने चौघे गावात आले होते. मात्र गावकऱ्यांनी त्यांना पकडलं. तिघांनी तलावात उडी मारुन पळ काढला. पण शाहरुखला पोहता येत नसल्याने तो मागेच राहिला’, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

तरुण दुबईत काम करत असून एका महिन्यापूर्वी घरी आला होता. मित्राने फोन केल्यानंतर तो घरातून गेला होता अशी माहिती भावाने दिली आहे. जेव्हा शाहरुख घरी आलाच नाही तेव्हा कुटुंबियांना तो सकाळी घरी येईल असं वाटलं. मात्र सकाळी त्यांना पोलिसांकडून शाहरुख रुग्णालयात दाखल असल्याचा फोन आला.

कुटुंबियांनी शाहरुख चोरीचा प्रयत्न करत असल्याचा आरोप फेटाळला आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोन गुन्हे दाखल केले आहेत. पहिला गुन्हा हत्येच्या आरोपाखाली २५ जणांवर दाखल करण्यात आला असून, गाय चोरीचाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.