बिहारच्या दरभंगा जिल्ह्यात एका मुस्लिम युवकाने रमजानच्या पवित्र महिन्यात माणुसकीचे दर्शन घडवले आहे. मोहम्मद अशफाक या तरुणाने दोन दिवसांच्या चिमुकलीचे प्राण वाचवण्यासाठी रोझाचा उपवास मोडला. एसएसबीचे जवान रमेश सिंह यांच्या पत्नी आरती कुमारीने दरभंगाच्या खासगी नर्सिग होममध्ये एका मुलीला जन्म दिला. जन्मानंतर काहीवेळातच या मुलीची तब्येत बिघडण्यास सुरुवात झाली.

मुलीला तात्काळ ‘ओ’ निगेटीव्ह गटाच्या रक्ताची आवश्यकता होती. हा दुर्मिळ रक्तगट असल्याने हॉस्पिटललाही लगेच हे रक्त उपलब्ध करता येत नव्हते. त्यावेळी कुटुंबाने सोशल मीडियावर ‘ओ’ निगेटीव्ह गटाच्या रक्ताची तात्काळ आवश्यकता असल्याची पोस्ट टाकली. अशफाकच्या वाचनात ही पोस्ट आल्यानंतर त्याने तात्काळ फेसबुकवरुन कुटुंबाशी संपर्क साधला.

अशफाक रुग्णालयात पोहोचल्यानंतर काही खाल्ल्याशिवाय शरीरातून रक्त काढता येणार नाही असे डॉक्टरांनी सांगितले. अशफाकने लगेचच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्या चिमुकलीचे प्राण वाचवण्यासाठी आपला रोझाचा उपवास मोडण्याचा निर्णय घेतला. रोझाच्या उपवासापेक्षा कोणाचे तरी जीवन वाचवणे जास्त महत्वाचे होते. ती जवानाची मुलगी असल्याचे समजल्यानंतर मला अधिक प्रेरणा मिळाली असे अशफाकने सांगितले. चिमुलकीचा जीव वाचवल्याचा मला अभिमान आहे. रोझा पुन्हा ठेवता येईल पण कोणाला त्याचे आयुष्य परत मिळत नाही असे अशफाकने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. रमेश सिंह सध्या अरुणाचल प्रदेशमध्ये तैनात आहेत.