केंद्रीय गृहमंत्री अमित शाह १५ जानेवारी रोजी केरळ दौऱ्यावर जाणार आहेत. त्यावेळी त्यांना मोठ्या विरोधाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. केरळमधील इंडियन युनियन मुस्लिम लीगनं अमित शाह यांना विरोध करण्यासाठी १ लाख कार्यकर्त्यांच्या मदतीनं काळी भिंत उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

सुधारित नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ कोझिकोड येथे काढण्यात येणाऱ्या रॅलीमध्ये अमित शाह सहभागी होणार आहेत. इंडियन युनियन मुस्लिम लीगनं यावेळी त्यांचा विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. इंडियन युनियन मुस्लिम लीगच्या युवा ब्रिगेडचे सदस्य कालिकत विमानतळ ते वेस्टहिल हेलिपॅडदरम्यान असलेल्या ३५ किलोमीटरच्या रस्त्यावर मानवी साखळी उभारणार आहेत. तसंच यावेळी सर्व सदस्य काळ्या कपड्यांमध्ये त्यांचा निषेध करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

३५ किलोमीटरची मानवी भिंत
त्या ठिकाणी असलेले सर्व सदस्य काळ्या रंगाचे कपडे परिधान करणार आहेत. दुपारी ३ ते ४ या कालावधीत साखळी आंदोलन करण्यात येणार आहे, असं पक्षाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. अमित शाह हे करीपपूर विमानतळावर उतरतील आणि रॅलीच्या ठिकाणापर्यंतचा ३५ किलोमीटरचा प्रवास हेलिकॉप्टरनं करणार आहेत.

इंडियन युनियन मुस्लिम लीगनं यापूर्वी सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. देशभरात या कायद्याला होणारा विरोध पाहता भाजपानं जनतेशी संपर्क साधण्याचा निर्णय घेतला आहे. या कायद्याच्या समर्थनार्थ भाजपातर्फे अनेक ठिकाणी रॅली आणि सभांचं आयोजनही करण्यात येत आहे. तसंच भारतातील मुस्लिमांवर या कायद्याचा कोणताही परिणाम होणार नसल्याचंही भाजपाकडून सांगण्यात येत आहे.