पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेकदा वादग्रस्त विधानं न करण्याचं आवाहन करुनही पक्षातील नेते एकामागून एक वादग्रस्त विधानं करत आहेत. उत्तर प्रदेशच्या कौशंबी येथील चायल मतदारसंघाचे भाजपा आमदार संजय गुप्ता यांनी पक्षाच्या अडचणी वाढवणारं असंच एक वादग्रस्त विधान केलं आहे. गुप्ता यांचा वादग्रस्त ऑडियो सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये ते वीज वितरण विभागाच्या एका अधिकाऱ्याशी बोलताना मुसलमानांवर वीजचोरीचा आरोप करत आहेत. ९० टक्के वीजचोरीमध्ये मुसलमानांचा सहभाग आहे, मग तुम्ही त्यांच्यावर कारवाई का नाही करत, असं आमदार गुप्ता हे वारंवार बोलत  आहेत.

व्हायरल क्लिपमध्ये आमदार वीज वितरण विभागातील इंजिनिअरला धमकी देत आहेत. मी बदली करुन घेईन असं इंजिनिअरने म्हटल्यावर, तू उत्तर प्रदेशमध्ये कुठेही जा, पण वाचू शकणार नाही असं आमदार म्हणतात. मुसलमानांच्या घरी छापेमारी करुन वीजचोरीची चौकशी करावी आणि त्यांच्यावर एफआयआर दाखल करावा अशी मागणी या क्लिपमध्ये आमदार गुप्तांकडून वारंवार केली जात आहे.

एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, आमदाराच्या मतदारसंघात वीजचोरीच्या संशयातून काही मोठ्या उद्योगपतींच्या येथे छापेमारी आणि ७ जणांवर एफआयआर दाखल झाल्यानंतर आमदाराने इंजिनिअरला फोन केला होता. त्यांच्यासोबत फोनवर झालेलं हे बोलणं इंजिनिअरने रेकॉर्ड केलं. सध्या हा ऑडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून भाजपा आमदाराच्या वादग्रस्त विधानावर टीका होत आहे.