काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यानंतर उत्तर प्रदेशातील भाजपा आमदार विक्रम सैनी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. देशातील मुस्लिमांनी आता आनंदी असले पाहिजे. कारण मनात कुठलीही भिती न बाळगता ते आता गोऱ्या काश्मिरी मुलींसोबत लग्न करु शकतात. भाजपामधले बॅचलर्स (अविवाहित पुरुष) आता काश्मीरला जाऊन जमिनीचा प्लॉट विकत घेऊ शकतात तसेच तिथे लग्न करु शकतात असे सैनी म्हणाले.

मोदीजींनी आपले स्वप्न पूर्ण केले असून संपूर्ण देशात कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयाचा जल्लोष सुरु आहे असे वक्तव्य सैनीने केले. भाजपामधले जे बॅचलर लग्न करण्यासाठी आतुर आहेत ते काश्मीरला जाऊ शकतात. आम्हाला काही अडचण नाही. भाजपामधल्या मुस्लिम कार्यकर्त्यांनी आता आनंदी असले पाहिजे. ते गोऱ्या काश्मिरी मुलीसोबत लग्न करु शकतात अशी मुक्ताफळे विक्रम सैनी यांनी उधळली आहेत.

विक्रम सैनी उत्तर प्रदेशातील खतौली विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी खतौलीच्या एका हॉलमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तिथे शेकडो भाजपा कार्यकर्त्यांसमोर बोलताना सैनी यांनी ही धक्कादायक विधाने केली. जे सरदार पटेलांना करायचे होते ते पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी करुन दाखवले. आता त्यांना सत्तेमधून कोणीही हटवू शकत नाही. आज दिवाळी आहे. तुम्ही सर्वांना आनंदी असले पाहिजे. घरासमोर पाच ते सात दिवे लावून आनंद साजरा करा असे सैनी म्हणाले. विक्रम सैनी हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात.