मुसलमानांना स्वत:ची लोकसंख्या वाढवून भारतात वर्चस्व प्रस्थापित करायचे आहे. त्यामुळेच मुस्लिम जोडपी डझनभर मुलं जन्माला घालतात, असे वादग्रस्त विधान भाजपाचे आमदार बनवारीलाल सिंघल यांनी केले आहे. बनवारीलाल सिंघल हे राजस्थानच्या अलवार (शहरी) मतदारसंघाचे आमदार आहेत. सिंघल यांनी फेसबुकवर नुकताच वादग्रस्त मजकूर पोस्ट केला होता. देशातील हिंदूंपेक्षा स्वत:ची लोकसंख्या वाढवण्यासाठी मुस्लिम लोक डझनभर मुलं जन्माला घालतात. असे करून त्यांना देशात वर्चस्व प्रस्थापित करायचे आहे, असे सिंघल यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. या पोस्टवरून वाद निर्माण झाल्यानंतर माफी मागण्याऐवजी त्यांनी आणखी एक वादग्रस्त विधान करून वादाला आणखीनच फोडणी दिली. त्यांनी फेसबुक पोस्टविषयी प्रसारमाध्यमांसमोर स्पष्टीकरण देताना आपल्या विधानाचे समर्थन केले. एवढेच नव्हे तर एखाद्या जोडप्याला जास्त मुलांना जन्म देता येणे शक्य नसेल तर मुस्लिम पुरूष दुसरं लग्न करायलाही मागेपुढे पाहत नाहीत. त्यासाठी मग बिहार आणि पश्चिम बंगालमधून मुली विकत घ्याव्या लागल्या, तर मुस्लिम पुरूष तेदेखील करतील. अलवारमध्ये अशी अनेक उदाहरणे सापडतील, असे सिंघल यांनी सांगितले. अलवार आणि अजमेर लोकसभा मतदारसंघात होऊ घातलेल्या पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सिंघल यांच्या विधानाने अनेकांचे लक्ष वेधले गेले आहे.

‘लव्ह जिहाद’चा आरोप करणाऱ्या नेत्याची भाजपानं केली हकालपट्टी

सिंघल यांना या सगळ्याबद्दल विचारले असता त्यांनी म्हटले की, मी एका वृत्तवाहिनीवरील चर्चा ऐकल्यानंतर ही फेसबुक पोस्ट केली. या चर्चेत हिंदू स्वाभिमान संघटनेचे समन्वयक यति नरसिंह नंद सरस्वती यांचा मुद्दा मला पटला. यति नरसिंह नंद सरस्वती यांनी देशातील लोकसंख्येच्या सांख्यिकी विश्लेषणाचा दाखला देत म्हटले होते की, जेव्हा जगातील कोणत्याही देशात मुस्लिमांची देशातील लोकसंख्या ३० टक्क्यांच्या वर पोहोचते त्या देशात मुस्लिमांचे वर्चस्व प्रस्थापित होते. आपल्या इतिहासातही अशी उदाहरणे आहेत, असे नरसिंह नंद सरस्वती यांनी म्हटले होते. हिंदू लोक हे आपल्या मुलांचे शिक्षण आणि संगोपन चांगल्या पद्धतीने व्हावे, याकडे लक्ष देतात. तर मुस्लिम लोक केवळ जास्तीत जास्त मुले जन्माला घालून लोकसंख्या कशी वाढवता येईल, याचा विचार करतात. त्यांना शिक्षण आणि विकासाशी काहीही देणेघेणे नसते, असेही यति नरसिंह नंद सरस्वती यांनी म्हटले होते. त्यांचे हे विधान पटल्यामुळेच मी फेसबुकवर पोस्ट टाकली. मुस्लिम लोक पद्धतशीरपणे आपली लोकसंख्या वाढवत आहेत. त्यामुळे भविष्यात देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती आणि बहुतांश राज्यांच्या मुख्यमंत्रिपदी मुस्लिम व्यक्तीच असतील, अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते, असे सिंघल यांनी सांगितले.

सैन्याचे जवान आहेत, मग जीव तर जाणारच: भाजपा खासदार