उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथे मुस्लिम समाजातील लोक मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे माफी मागण्याची मागणी करत आहेत. मुस्लिमांनी केलेल्या आरोपानुसार, फिरोजाबादमध्ये योगी आदित्यनाथांच्या सभेसाठी पोहोचलेल्या मुस्लिम महिलांची सुरक्षा तपासणी करताना बुरखा हटवण्यास सांगण्यात आलं, त्यानंतरच त्यांना परवानगी देण्यात आली. यामध्ये स्थानिक पोलीस आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सुरक्षेची जबाबदारी असणा-या यंत्रणा सामील होत्या असा दावा भारतीय मुस्लिम विकास परिषद नावाच्या संस्थेने केला आहे.

सुरक्षा यंत्रणांनी मुस्लिम महिलांना दिलेली वागणूक योग्य नसून त्यांनी लिखित माफी मागितली पाहिजे अशी मागणी या संस्थेकडून करण्यात आली आहे. संस्थेचे चेअरमन शमी अघाई यांनी सांगितल्यानुसार, ‘यासाठी मुख्यमंत्र्यांनीही माफी मागितली पाहिजे अन्यथा जे काही झालं त्याला त्यांचं समर्थन होतं असं समजलं जाईल’.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ दोघेही सबका साथ सबका विकासच्या घोषणा करत असतात, मात्र मुस्लिमांविरोधात जो द्वेष पसरवला जात आहे त्याविरोधात ते काहीच करत नाहीत असा आरोप भारतीय मुस्लिम विकास परिषदेने केला आहे. अशा घटनांमुळे सरकारच्या प्रतिमेवर परिणाम होत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. शमी अघाई यांनी सांगितल्यानुसार, त्यांनी यासंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्र लिहून कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. जर कारवाई झाली नाही तर रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.