लाखो फ्रेंच लोकांना ठार करण्याचा मुस्लिमांना अधिकार आहे असं धक्कादायक वक्तव्य मलेशियाचे माजी पंतप्रधान डॉ. महाथिर मोहम्मद यांनी केलं होतं. गुरूवारी फ्रान्समध्ये एका हल्लेखोराने अल्लाह हू अकबरचे नारे देत एका चर्चमध्ये हल्ला केला. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये एका महिलेचाही समावेश होता. या महिलेचा गळा चिरुन हत्या करण्यात आली. या घटनेबाबत ट्वीट करताना आत्तापर्यंत झालेला रक्तपात पाहता लाखो फ्रेंच नागरिकांना ठार करण्याचा आणि आपला राग व्यक्त करण्याचा अधिकार मुस्लिमांना आहे असं मलेशियाचे माजी पंतप्रधान महाथिर मोहम्मद यांनी म्हटलं होतं. परंतु काही वेळानंतर त्यांनी आपलं ट्वीट डिलीट केलं. त्यांच्या या ट्वीटनंतर फ्रान्सकडूनही प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

“नुकतीच ट्विटर फ्रान्सच्या व्यवस्थापकीय संचालकांशी चर्चा झाली आहे. मलेशियाचे माजी पंतप्रधान महाथिर मोहम्मद यांचं ट्विटर खातं त्वरित निलंबित केलं जाणं आवश्यक आहे. तसं नसल्यास ट्विटर हा हत्येच्या औपचारिक आवाहनाचा एक साथीदार ठरेल.” असं मत फ्रान्सच्या डिजिटल क्षेत्राचे राज्य सचिव कॅड्रिक ओ यांनी व्यक्त केलं.

आणखी वाचा- लाखो फ्रेंच लोकांना ठार करण्याचा मुस्लिमांना अधिकार; माजी पंतप्रधानांचं धक्कादायक वक्तव्य

काय म्हणाले होते महाथिर?

“फ्रान्सचा इतिहास पाहिला तर आजवर त्या देशानेही लाखो माणसं मारली त्यामध्ये अनेक मुस्लिम होते. फ्रान्सने घडवलेला रक्तपात पाहता मुस्लिम लोकांनी जर राग व्यक्त केला आणि माणसं मारली तर त्यांना त्याचा पूर्ण हक्क आहे,” असंही महाथिर यांनी म्हटलं होतं.

काही दिवसांपूर्वी फ्रेंच शिक्षकाची हत्या करण्यात आली. त्यानंतर गुरूवारी फ्रान्समधल्या चर्चमध्ये हल्ला झाला. या घटनेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शब्दांमध्ये निषेध नोंदवला आहे. दरम्यान, मलेशियाचे माजी पंतप्रधान महाथिर मोहम्मद यांनी मुस्लिमांना लाखो फ्रेंच नागरिकांना मारण्याचा अधिकार आहे असं धक्कादायक ट्वीट या घटनेबाबत केलं होतं.

मोहम्मद पैगंबरांच्या कार्टूनवरुन सुरु झालेल्या वादातून फ्रान्सच्या चर्चमध्ये चाकू हल्ला झाला करण्यात आला होता. यामध्ये एका महिलेसह तिघांची हत्या करण्यात आली आहे. ज्या हल्लेखोराने हत्या केली त्याने आधी अल्लाह हू अकबरचे नारे दिले. फ्रान्सच्या नीस शहरात असलेल्या चर्चमध्ये ही घटना घडली.

आणखी वाचा- फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांविरोधात भोपाळमध्ये मुस्लिमांचं आंदोलन; गर्दी पाहून भाजपा नेता म्हणाले…

पंतप्रधान मोदींनी नोंदवला तीव्र निषेध

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा निषेध केला. “नीसमधील चर्चमध्ये झालेल्या भयंकर हल्ल्यासह फ्रान्समध्ये अलीकडे झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचा मी निषेध करतो. आमच्या सहवेदना हल्ल्यात जीव गमावलेल्यांच्या कुटुंबीयांच्या व फ्रान्समधील नागरिकांबरोबर आहेत. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारत फ्रान्ससोबत उभा आहे आहे,” असं पंतप्रधान मोदी म्हणाले.