लाखो फ्रेंच लोकांना ठार करण्याचा मुस्लिमांना अधिकार आहे असं धक्कादायक वक्तव्य मलेशियाचे माजी पंतप्रधान महाथिर मोहम्मद यांनी केलं आहे. आजच फ्रान्समध्ये एका हल्लेखोराने अल्ला हू अकबरचे नारे देत एका चर्चमध्ये हल्ला केला. तीन नागरिकांना ठार केलं. यामध्ये एका महिलेचाही समावेश होता. या महिलेचा गळा चिरुन त्याने तिची हत्या केली. या घटनेबाबत ट्विट करताना आत्तापर्यंत झालेला रक्तपात पाहता लाखो फ्रेंच नागरिकांना ठार करण्याचा आणि आपला राग व्यक्त करण्याचा अधिकार मुस्लिमांना आहे असं मलेशियाचे माजी पंतप्रधान महाथिर मोहम्मद यांनी म्हटलं आहे.

 

 

फ्रान्सचा इतिहास पाहिला तर आजवर त्या देशानेही लाखो माणसं मारली त्यामध्ये अनेक मुस्लिम होते. फ्रान्सने घडवलेला रक्तपात पाहता मुस्लिम लोकांनी जर राग व्यक्त केला आणि माणसं मारली तर त्यांना त्याचा पूर्ण हक्क आहे असंही महाथिर यांनी म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वी फ्रेंच शिक्षकाची हत्या करण्यात आली. त्यानंतर आजच फ्रान्समधल्या चर्चमध्ये हल्ला झाला. या घटनेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शब्दांमध्ये निषेध नोंदवला आहे. दरम्यान मलेशियाचे माजी पंतप्रधान महाथिर मोहम्मद यांनी मुस्लिमांना लाखो फ्रेंच नागरिकांना मारण्याचा अधिकार आहे असं धक्कादायक ट्विट या घटनेबाबत केलं आहे.

मोहम्मद पैगंबरांच्या कार्टूनवरुन सुरु झालेल्या वादातून फ्रान्सच्या चर्चमध्ये चाकू हल्ला झाला आहे. यामध्ये एका महिलेसह तिघांची हत्या करण्यात आली आहे. ज्या हल्लेखोराने हत्या केली त्याने आधी अल्ला हो अकबरचे नारे दिले. फ्रान्सच्या नीस शहरात असलेल्या चर्चमध्ये ही घटना घडली.

पंतप्रधान मोदींनी नोंदवला तीव्र निषेध

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा निषेध केला. “आज नीसमधील चर्चमध्ये झालेल्या भयंकर हल्ल्यासह फ्रान्समध्ये अलीकडे झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचा मी निषेध करतो. आमच्या सहवेदना हल्ल्यात जीव गमावलेल्यांच्या कुटुंबीयांच्या व फ्रान्समधील नागरिकांबरोबर आहेत. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारत फ्रान्ससोबत उभा आहे आहे,” असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

 इतिहास शिक्षकाचा करण्यात आला होता शिरच्छेद

काही दिवसांपूर्वीच प्रेषित महंमद पैगंबर यांची व्यंगचित्रं दाखवून त्याविषयावर चर्चा घडविल्यामुळे पॅरिसमध्ये एका इतिहासाच्या शिक्षकाचा शिरच्छेद करण्यात आला होता. ज्याने ही हत्या केली, तो १८ वर्षीय चेनेन नावाचा संशयित आरोपी पोलिसांच्या चकमकीत ठार झाला होता.