निवडणूक देशातील मुस्लिमांच्या पाठिंब्याशिवायही जिंकता येऊ शकते, हे या लोकसभा निवडणुकीतून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता समाजातील अल्पसंख्याकांनी हिंदुंच्या भावनांचा आदर करण्याची वेळ आली आहे. असे वादग्रस्त विधान विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल यांनी केले आहे. 
सिंघल म्हणाले की, निवडणुकीत देशातील मुस्लिमांच्या भावनांचा वापर करून मतांचे राजकारण करणाऱया शक्तींना यावेळीच्या निवडणुकीत चांगलाच फटका बसला आहे. आता देशात मुस्लिमांना सर्वसामान्य नागरिकाप्रमाणेच वागणूक दिली जाईल. त्यामुळे मुस्लिमांनी हिंदुंच्या भावनांचा आदर राखणे शिकायला हवे असेही सिंघल म्हणाले. तसेच मुस्लिमांनी हिंदुंना सतत विरोध केल्यास या देशात मुस्लिम किती राहतील? अशी वादग्रस्त विचारणाही सिंघल यांनी यावेळी केली.
सिंघल यांच्या वक्तव्याचा काँग्रेस नेते मनिष तिवारी यांनी निषेध व्यक्त केला आहे. देशातील अल्पसंख्याकांचे एखादा पक्ष कसे रक्षण करतो याला खरे महत्व असते. त्यादृष्टीनेच भूमिका असावी लागते असा टोलाही तिवारी यांनी लगावला आहे. तर, देशात मुस्लिम आणि हिंदू एकत्रच राहतात त्यामुळे पंतप्रधान मोदी देखील सिंघल यांच्या वक्तव्यावर सहमत नसावेत असे राजीव शुक्ला म्हणालेत.
सिंघल यांच्या विधानावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना विचारले असता, देशात सर्व समान आहेत परंतु, यावेळी मुस्लिम मतांचे राजकारण निवडणूकीत चालले नाही असेही राऊत म्हणाले.