जम्मू-काश्मीरमधील मुस्लिम समाजाचे बहुसंख्यत्व कायम राखण्यासाठी मुसलमानांनी एका पेक्षा जास्त विवाह आणि शक्य तेवढ्या मुलांना जन्म देण्याचे आवाहन धार्मिक वृत्तीच्या एका नेत्याने केले आहे. मोहम्मद कासिम नावाच्या या नेत्याने ‘मुस्लिम दिनिमहाज’ या आपल्या पक्षाद्वारे प्रसिद्ध केलेल्या संदेशात, ज्या मुसलमानांची सांपत्तिक स्थिती चांगली आहे, त्यांनी एकापेक्षा अधिक विवाह करून शक्य तेवढ्या मुलांना जन्म देण्याचे आवाहन केले. एका हत्येच्या प्रकरणात सध्या तो जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. ‘दुख्तरान-ए-मिल्लत’ची प्रमुख आसिया अंद्र्राबीचा पती असलेला कासिम काश्मीरमधील मुस्लमानांच्या प्रश्नाविषयी म्हणाला, जम्मू-काश्मीरमध्ये शरणार्थिंना वसविणे म्हणजे या राज्यात बहुसंख्येने असलेल्या मुसलमानांचा सांख्यिकी दर्जा ढासळविण्याचे षडयंत्र आहे. काश्मिरी मुसलमान आपल्या विनाशास स्वत:च कारणीभूत होत आहेत. मुलींची उशिराने लग्न होत असल्याने मुलांना जन्म देण्याच्या क्षमतेवर याचा परिणाम होतो. उशिरा लग्न होण्यामागे मुलींना आर्थिकबाबीत स्वावलंबी होण्याचे कारण दिले जाते. लग्न झाल्यावर ‘हम दो हमारे दो’ आणि ‘पहला अभी नहीं, दूसरा कभी नहीं’ सारख्या जन्म नियंत्रणासंबधीच्या घोषणा सतत नवदाम्पत्यावर थोपविण्यात येतात. आर्थिक समस्येच्या भीतीने कमी मुले जन्माला घालणे, हे केवळ अज्ञान असल्याची शेरेबाजी देखील त्याने केली. देशात हिंदूंची संख्या ८० टक्के असतानादेखील हिंदू नेते स्त्रियांना पाच मुलांना जन्म देण्याचे आवाहन करीत असल्याची बाब आश्चर्यजनक असल्याचेही तो म्हणाला.