गुजरातमधील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच रस्सीखेच सुरु आहे. त्यातच आता पोस्टर वॉरही सुरु झाले आहे. यामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांना लक्ष्य करण्यात आले आहे.

सुरतमध्ये एक पोस्टर लावण्यात आले असून यामध्ये पटेल यांना गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी निवडून आणण्यासाठी मुस्लिमांनी काँग्रेसला पाठिंबा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, अहमद पटेल यांनी पत्रकार परिषद घेऊन या पोस्टरबाजीचे खंडन केले आहे.


पटेल यांनी उलट भाजपवर निशाणा साधला असून भाजपकडूनच हा खोडसाळ प्रकार करण्यात येत असून ते चुकीच्या पद्धतीने प्रचार करीत असल्याचा आरोप केला. भाजपला पराजयाचा सामना करावा लागणार आहे, म्हणूनच त्यांच्याकडून असे उद्योग केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. मी कधीही मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार नव्हतो आणि असणार नाही असे यावेळी पटेल यांनी स्पष्ट केले.

पटेल म्हणाले, आपल्या २२ वर्षांच्या सत्तेच्या कार्यकाळात त्यांनी केलेल्या कामांपासून लक्ष हटवण्यासाठीच ते खोटी अफवा पसरवत आहेत. मात्र, यावेळी गुजरातच्या जनतेने बदल करण्याचा ठाम निश्चय केला आहे. भाजप हे चांगल्या प्रकारे जाणून आहे. या निवडणुकीत भाजपची हार होणार हे त्यांना माहिती असल्याने ते बनावट पोस्टर आणि खोट्या अफवा पसरवत आहेत, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

भाजपने येथे सुरुवातीलाच मुख्यमंत्रीपदाचे नाव घोषित केले आहे. विद्यमान मुख्यमंत्री विजय रुपानी यांचेच नाव पुन्हा सुचवण्यात आले आहे. काँग्रेसकडून मात्र असे कुठलेही नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.