बराक ओबामा यांचे प्रतिपादन; पर्ल हार्बर हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली

अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आणि जपानचे पंतप्रधान शिंझो अ‍ॅबे यांनी पर्ल हार्बर येथे ऐतिहासिक भेट देऊन श्रद्धांजली अर्पण केली.

जपानने ७ डिसेंबर १९४१ रोजी पर्ल हार्बरवर हल्ला केला होता. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना या दोन नेत्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. तसेच जगाला युद्धापेक्षा शांतता आवश्यक असल्याचेही ओबामा यावेळी म्हणाले. या कार्यक्रमावर टीका करणाऱ्यांचाही ओबामा यांनी यावेळी समाचार घेतला. ओबामा यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ पुढील महिन्यात संपुष्टात येत आहे.

युद्धात दोन देशांच्या क्षमतांची कसोटी लागते. मात्र, त्यानंतरच या देशांना शांततेचा खरा अर्थ कळतो, असेही ओबामा म्हणाले. मैत्रीसाठी अमेरिकेत आलेल्या अ‍ॅबे यांचे ओबामा यांनी यावेळी स्वागत केले. या भेटीद्वारे जगभरात शांततेचा संदेश गेला आहे. अधिकाधिक युद्धे जिंकण्यापेक्षा शांतता जिंकण्याचा प्रयत्न करण्याची गरज असल्याचेही ओबामा यावेळी म्हणाले. जपानकडून पर्ल हार्बर येथे करण्यात आलेल्या हल्ल्यात २ हजार ४०० अमेरिकी नागरिकांना प्राण गमवावे लागले होते. दुसऱ्या महायुद्धात झालेल्या या हल्ल्याला ७५ वर्षे पूर्ण झाली. युद्धाची दहशत पुन्हा निर्माण होऊ नये असाच प्रयत्न असल्याचेही ओबामा यावेळी म्हणाले.

[jwplayer cEqPHXFy]

जपान आणि अमेरिका यांनी मैत्री आणि शांततेचा मार्ग स्वीकारला आहे.

हे दोन्ही देश विविध विषयांवर परस्परांना सहकार्य करतील, असेही बराक ओबामा म्हणाले. ओबामा आणि अ‍ॅबे यांच्या याआधी झालेल्या बैठकीत आर्थिक, संरक्षण, जागतिक आव्हाने या विषयांवर चर्चा करण्यात आली होती, अशी माहिती व्हाईट हाऊसने दिली आहे. ओबामा यांच्या कारकिर्दीतील ही अखेरची बैठक ठरणार आहे.

ओबामा यांनी हिरोशीमा येथे भेट दिल्यानंतर अणुबॉम्ब हल्ल्याची जबाबदारी स्वीकारून माफी मागण्यास नकार दिला होता. त्याचप्रमाणे अ‍ॅबे यांनीही या हल्ल्याबाबत माफी मागितली नाही.

[jwplayer 4TooNnh0]