ब्रिटनमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. मात्र यासंदर्भात एक धक्कादायक माहिती समोर आली होती. ब्रिटनमध्ये वाढणारी करोना रुग्णांची संख्या ही नवीन प्रकारच्या करोना विषाणूमुळे आहे. करोनाच्या या नव्या विषाणूमुळेच ब्रिटन आणि युरोपीयन देशांमध्ये पुन्हा करोनाबाधितांची संख्या वेगानं वाढू लागल्याचे सांगितलं जात आहे. हा करोनाचा विषाणू आधीच्या विषाणूपेक्षा वेगळा असल्याची माहिती समोर आल्यानंतर लंडन आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. दरम्यान, नेदरलँड आणि बेल्जिअमनं ब्रिटनमध्ये जाणाऱ्या आपल्या विमानसेवा तात्पुरत्या स्थगित केल्या आहेत. तर दुसरीकडे इटलीदेखील विमानसेवा तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्याच्या विचारात आहे.

यानंतर जर्मन सरकारनं ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेत जाणाऱ्या विमानसेवा तात्पुरत्या स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. जर्मनीच्या आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांकडून रविवारी याबाबत माहिती देण्यात आली. तर दुसरीकडे करोना विषाणूचा वाढता प्रसार पाहता बेल्जिअम आणि नेदरलँडनं यापूर्वीच ब्रिटनच्या विमानसेवा तात्पुरत्या स्थगित केल्या आहेत. एनडीटीव्हीनं एएफपीच्या हवाल्यानं हे वृत्त दिलं आहे. “सध्या ब्रिटन घेत असलेल्या प्रत्येक निर्णयावर आमचं लक्ष आहे. करोना विषाणूच्या नव्या स्ट्रेनशी निगडीत सूचनांचा आणखी डेटा आम्ही मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत. जर्मनी अन्य युरोपीय देशांच्याही संपर्कात आहे. सध्या जर्मनीत नव्या स्टेनचा कोणताही रुग्ण सापडला नसल्याची माहिती,” जर्मनीच्या आरोग्य मंत्रालयाच्या प्रवक्त्यांकडून देण्यात आली.

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी लंडन आणि साऊथईस्ट इंग्लंडच्या सर्व भागांमध्ये ३० डिसेंबरपर्यंत लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला आहे. या ठिकाणी मूळ करोना विषाणूपेक्षा अधिक जास्त वेगानं पसरणारा स्ट्रेन सापडला असल्याचं सांगण्यात आलं आहे. बेल्जिअमच्या निर्णयानंतर विमानसेवेसोबतच युरोस्टार ट्रेन सेवांचं संचलनदेखील प्रभावित होणार आहे. तसंच युरोपिय देशांनी ख्रिसमस आणि नववर्षांच्या पूर्वीच हे पाऊल उचललं आहे. या कालावधीत अनेक जण बाहेर फिरण्यासाठी जात असतात. गेल्या वर्षी याच कालावधीत करोनाचा मोठ्या प्रमाणात प्रसार होण्यास सुरूवात झाली होती. इटली, फ्रान्स, ब्रिटनमध्ये सुरूवातीला मोठ्या प्रमाणात या विषाणूचा प्रसार झाला होता. त्यामुळे यावेळी या देशांकडून आधिपासूनच सतर्कता बाळगण्यात येत आहे.