News Flash

मुझफ्फरनगर महापंचायत: संयुक्त किसान मोर्चाकडून २७ सप्टेंबर रोजी भारत बंदची हाक

या महापंचायतीत शेतकरी नेते राकेश टिकैत, योगेंद्र यादव यांच्यासह अनेक नेत्यांची उपस्थिती होती.

farmer
मुझफ्फरनगर महापंचायत (Photo- Indian Express)

केंद्राच्या तीन शेती कायद्यांना विरोध करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाने आज उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमध्ये महापंचायतीचे आयोजन केले होते. २७ सप्टेंबर रोजी भारत बंदची हाक देण्याचा निर्णय या महापंचायतीत घेण्यात आला आहे. यापूर्वी शेतकरी संघटनेने २५ सप्टेंबरला बंद पाळण्यात येणार असल्याचे सांगितले होते. या महापंचायतीत शेतकरी नेते राकेश टिकैत, योगेंद्र यादव यांच्यासह अनेक नेत्यांची उपस्थिती होती.

या महापंचायतीत बोलताना योगेंद्र यादव म्हणाले, “शेतकरी आंदोलनाची तीव्रता कमी होत असल्याचं गेल्या १०० दिवसांपासून सरकारचे लोक म्हणत होते. मात्र आजची गर्दी पाहून हे मैदान, हे शहर सर्वांना सामावून घेण्यात कमी पडलंय. उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांवर कोट्यवधी रुपयांचे कर्ज होते. हे तेच मुझफ्फरनगर आहे जिथे हिंदू आणि मुस्लिमांमध्ये संघर्ष होऊन रक्ताच्या नद्या वाहिल्या गेल्या. या लोकांनी घरे जाळून राजकारण केले. जी व्यक्ती राज्यातील दोन समाजात द्वेष निर्माण करते, ती व्यक्ती या राष्ट्राचा खरा पुत्र असूच शकत नाही,” अशा शब्दांत योगेंद्र यादव यांनी टीका केली.

“देश विकणारे हे लोक कोण आहेत? आपण त्यांना ओळखायला पाहिजे. त्यासाठी आपल्याला अशा मोठ्या सभा, मेळावे घेण्याची गरज आहे. आमचे ध्येय फक्त यूपी किंवा उत्तराखंड वाचवण्याचे नाही, तर हा देश वाचवण्याचे आहे. केंद्र सरकारने २२ जानेवारीपासून आमच्यासोबत चर्चा थांबवली. गेल्या नऊ महिन्यांत ६०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. मात्र, त्यांनी त्यावर एक शब्दही काढलेला नाही. आमचे मिशन फक्त उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडपर्यंत मर्यादित राहणार नसून ते देशपातळीवर असेल. केंद्र सरकारने देशातील जनतेची फसवणूक केली आहे. ते आपच्या शेतजमिनी, हायवे, वीज, एलआयसी, बँका अदानी आणि अंबानी सारख्या लोकांना विकत आहेत. अगदी एफसीआय गोदामे आणि बंदरे देखील विकली जात आहेत. या सरकारने पूर्ण देशच विक्रीसाठी काढला आहे,” असं शेतकरी नेते राकेश टिकैत म्हणाले.

ही महापंचायत गेल्या ९ महिन्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी पंचायत असेल, असं संयुक्त किसान मोर्चाने म्हटलं होतं. त्याचा प्रत्यय आज आला असून मुझफ्फरनगरमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी एकत्र आले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 5, 2021 5:48 pm

Web Title: muzaffarnagar mahapanchayat samyukt kisan morcha issues call for bharat bandh on september 27 hrc 97
Next Stories
1 पाकिस्तानच्या क्वेट्टामध्ये आत्मघातकी हल्ला; तिघांचा मृत्यू , २० जण जखमी
2 जी-७ राष्ट्रांच्या एकूण लसीकरणाहूनही अधिक लसीकरण भारतात केवळ ऑगस्ट महिन्यात; केंद्राचा दावा
3 पेट्रोल- डिझेलच्या दरात घट; जाणून घ्या नवे दर…
Just Now!
X