मुजफ्फरनगरमध्ये विद्यार्थिनीची छेडछाड करण्याचा आरोप असलेल्या आरोपींना अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर जमावाने हल्ला केल्याची घटना घडली आहे. जमावाने केलेल्या हल्ल्यामध्ये पोलिसांच्या दोन गाड्यांची तोडफोड झाल्याची माहिती आहे. जमावाने केलेल्या दगडफेकीत 3-4 पोलिसकर्मी जखमी झाल्याचंही समजतंय. दोन समाजातील हे प्रकरण असल्यामुळे पोलिसांचा मोठ्या प्रमाणात फौजफाटा घटनास्थळी तैनात करण्यात आला आहे.


मुजफ्फरनगरमधील बुढाना-कोतवाली परिसरातील सफीपूर या गावामधील काही विद्यार्थिनींची छेड काढण्याचा प्रकार घडला. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर बुढाना कोतवाली पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आरोपींना ताब्यात घेतलं. मात्र, त्याचवेळेस तेथे जमाव एकत्र आला आणि आरोपींच्या अटकेविरोधात त्यांनी तेथील वाहतूक रोखून धरली. वाहतूक रोखणाऱ्यांशी चर्चा करण्याचा आणि त्यांना शांत राहण्याचा प्रयत्न पोलीस करत असताना त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली.

जमावाने केलेल्या जोरदार दगडफेकीत पोलिसांच्या दोन गाड्यांचं नुकसान झालं, तर 3-4 पोलिसकर्मी जखमी झाल्याचंही समजतंय. जखमी पोलिसांना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. दोन समाजातील हे प्रकरण असल्यामुळे पोलिसांचा मोठ्या प्रमाणात फौजफाटा घटनास्थळी तैनात करण्यात आला आहे. पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या ५ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून इतरांचा शोध सुरू आहे.