साक्षीदार उलटल्याचा परिणाम

कौनैन शेरीफ एम./ एक्स्प्रेस वृत्तसेवा, मुझफ्फरनगर

मुझफ्फरनगरमध्ये २०१३ मध्ये उसळलेल्या दंगलीतील एकूण ४१ पैकी ४० प्रकरणांमध्ये आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे. यामध्ये हत्येचा आरोप असलेले आरोपीही होते. दंगलीत एकूण ६५ जण ठार झाले होते.

उत्तर प्रदेश सरकारने हत्येचे १० खटले दाखल केले होते. त्यामध्ये ठार झालेल्यांचे नातेवाईकच बहुतांश साक्षीदार होते. ते उलटल्याने न्यायालयाने या प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. मुझफ्फरनगर न्यायालयाने २०१७ पासून दंगलीशी संबंधित एकूण ४१ प्रकरणांमध्ये निकाल दिला आहे. हत्येच्या केवळ एकाच खटल्यात आरोपींना दोषी ठरविले आहे.

कावल गावामध्ये २७ ऑगस्ट २०१३ रोजी सचिन आणि गौरव या चुलत भावांची हत्या करण्यात आल्याने दंगली उसळल्या होत्या. त्या प्रकरणातील मुझम्मील, मुजस्सीम, फुरकान, नदीम, जहांगीर, अफझल आणि इक्बाल या सात आरोपींना सत्र न्यायालयाने ८ फेब्रुवारी रोजी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती.

‘दी इंडियन एक्स्प्रेस’ने तक्रारदारांच्या आणि साक्षीदारांच्या न्यायालयातील नोंदीची छाननी केली आहे. हत्येच्या १० प्रकरणांत निर्दोष मुक्तता झालेल्यांबाबत अधिकाऱ्यांच्या मुलाखतीही घेतल्या आहेत. त्यामध्ये असे आढळले की, एका कुटुंबाला जिवंत जाळण्यात आल्याच्या घटनेपासून ते तीन मित्रांची शेतात करण्यात आलेली हत्या, तलवारीने एक वडिलांची करण्यात आलेली हत्या तर फावडय़ाने मारहाण करून काकाची करण्यात आलेली हत्या या प्रकरणातील ५३ जणांना निर्दोष मुक्त करण्यात आले. इतकेच नव्हे तर सामूहिक बलात्काराची चार प्रकरणे आणि दंगलींच्या २६ प्रकरणांमधील आरोपींचीही मुक्तता करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.

मुझफ्फरनगर जिल्हा प्रशासनाचे वकील दुष्यंत त्यागी यांनी ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले की, २०१३ च्या मुझफ्फरनगर दंगलीप्रकरणी आम्ही अपील करणार नाही, कारण सर्व प्रकरणांमध्ये न्यायालयाने मुख्य साक्षीदार उलटल्याचे म्हटले आहे. साक्षीदारांनी दिलेल्या जबानीनुसार आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.