मुझफ्फरनगर दंगलप्रकरणी लखनऊ पोलिसांनी शुक्रवारी भाजपचे आमदार सुरेश राणा यांना शुक्रवारी अटक केली. प्रक्षोभक भाषण करून जातीय दंगल पेटवल्याच्या आरोपाखाली राणा यांना अटक करण्यात आली आहे. दंगलग्रस्त शामली जिल्ह्य़ातील थाना भवन हा राणा यांचा मतदारसंघ आहे. मुझफ्फरनगर दंगलप्रकरणी राजकीय नेत्याला अटक होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
मुझफ्फरनगरमध्ये दोन गटांत गेल्या आठवडय़ात दंगल उसळली होती. दंगलीचे हे लोण मुझफ्फरनगरच्या परिसरातील गावांतही पोहोचले होते. यात एकूण ४७ जणांचा बळी गेला. याप्रकरणी सत्ताधारी समाजवादी पक्ष व प्रमुख विरोधक भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात होत्या. भाजपच्या नेत्यांनीच दंगल पेटवल्याचा आरोप समाजवाजी पक्षातर्फे केला जात होता. या पाश्र्वभूमीवर राणा यांना शुक्रवारी अटक झाली. उत्तर प्रदेश विधानसभेचे अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर तातडीने अटकेची ही कारवाई करण्यात आली आहे. राणा येथील भाजप कार्यालयातून मतदारसंघाकडे परतत असताना सायंकाळी पोलिसांनी त्यांना अटक केली. प्रक्षोभक भाषण करून शामली जिल्ह्य़ात दंगल पेटवल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे. भाजपने या अटकेविरोधात तीव्र निषेध नोंदवला आहे.
पुनर्वसन छावण्यांमधील गर्भवतींची काळजी घ्या
मुझफ्फरनगरमधील पुनर्वसन छावण्यांमध्ये ठेवण्यात आलेल्या गर्भवती महिलांच्या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त करून राष्ट्रीय महिला आयोगाने या महिलांना सकस आहार आणि वैद्यकीय मदत योग्य प्रकारे मिळते आहे का, त्याकडे लक्ष देण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.
महिला आयोगाच्या अध्यक्ष ममता शर्मा यांनी गुरुवारी या पुनर्वसन छावण्यांना भेट दिली आणि परिस्थितीची पाहणी केली. या छावण्यांमध्ये १३८ गर्भवती महिला असल्याचे त्यांना आढळले. गर्भवती महिला निर्वासितांची योग्य प्रकारे काळजी घेण्याचे आदेश ममता शर्मा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
बाधित परिसरातील मुलींनी निर्भयपणे शाळेत जावे, त्यांना योग्य संरक्षण देण्यात येईल, असे आवाहनही शर्मा यांनी या वेळी केले. पालकांनीही मुलींना शाळेत जाण्यापासून रोखू नये, असे आवाहनही महिला आयोगाच्या अध्यक्षांनी केले. मुझफ्फरनगर आणि नजीकच्या परिसरात उसळलेल्या जातीय दंगलीत ४८ जण ठार झाले असून ४० हजारांहून अधिक जण बेघर झाले आहेत.
दंगलीतील मृतांची संख्या ४८
मुझफ्फरनगर आणि नजीकच्या परिसरात उसळलेल्या जातीय दंगलीतील मृतांची संख्या ४८ असल्याचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे. मृतांमध्ये पाच महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश असून त्यांच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली.एकूण ४८ मृतांपैकी ४३ जण मुझफ्फरनगरचे रहिवासी असून तीन जण मेरठचे, तर सहारणपूर आणि हापूर येथील प्रत्येकी एकाचा मृतांमध्ये समावेश आहे. दोघा मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
‘दंगलीच्या वेळी मुख्यमंत्री सुस्त राहिले’
मुझफ्फरनगर येथील धार्मिक दंगलीवरून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यावर काँग्रेसकडून टीकेचे प्रहार सुरूच आहेत. अखिलेश यादव यांनी दंगलीच्या काळात कमालीचा सुस्तपणा दाखवून संधिसाधू धोरण अवलंबल्याची टीका काँग्रेस नेते आणि केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री जयराम रमेश यांनी शुक्रवारी केली.
गेल्या महिन्यात झालेल्या या धार्मिक दंगलीदरम्यान सत्ताधारी समाजवादी पक्ष आणि भाजपमध्ये अपवित्र आघाडी होती. भाजपने हिंसाचार सुरूच राहावा अशीच भूमिका घेतल्याचा आरोप रमेश यांनी केला; परंतु या दंगलीला यादव यांना जबाबदार धरले नाही तसेच त्यांची गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी तुलनाही रमेश यांनी केली नाही. मात्र ज्या पद्धतीने मुख्यमंत्री अखिलेश वागले त्याबद्दल मला जबरदस्त धक्का बसला. त्यांच्या निष्क्रिय वागण्याने मी निराश आणि संतप्तही झाल्याचे रमेश यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले.