02 March 2021

News Flash

आणखी दोन आमदारांना अटक

उत्तर प्रदेशात मुझफ्फरनगर येथे झालेल्या दंगलप्रकरणी पोलिसांनी आज भाजपचे आमदार संगीत सोम व बहुजन समाज

| September 22, 2013 02:34 am

उत्तर प्रदेशात मुझफ्फरनगर येथे झालेल्या दंगलप्रकरणी पोलिसांनी आज भाजपचे आमदार संगीत सोम व बहुजन समाज पार्टीचे आमदार नूर सलीम राणा यांना अटक केली असून भाजप अध्यक्ष राजनाथ सिंग यांना दंगलग्रस्त मुझफ्फरनगर जिल्ह्य़ाचा दौरा करण्याची परवानगी जिल्हा प्रशासनाने नाकारली आहे.
उत्तर प्रदेशचे लखनौतील भाजप आमदार सुरेश राणा यांना मुझफ्फरनगर येथे दंगली भडकवणारी भाषणे केल्याच्या आरोपावरून कालच अटक करण्यात आली होती. भाजपचे आमदार संगीत सोम याना मीरत जिल्ह्य़ात, तर बहुजन समाज पार्टीचे आमदार नूर सलीम राणा यांना मुझफ्फरनगर येथून अटक करण्यात आली, असे पोलिस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) आर.के.विश्वकर्मा यांनी सांगितले.
आमदार सोम यांच्यावर खोटी व्हिडीओ अपलोड करून तसेच प्रक्षोभक भाषणे करून दंगल भडकावल्याचा आरोप असून त्यांना मीरत येथे अटक करण्यात आली.वरिष्ठ पोलिस अधीक्षक दीपक कुमार यांनी सांगितले की, सोम यांना त्यांच्या सारढाणा मतदारसंघातील सालवा गावात अटक करण्यात आली. मात्र त्यांनी शरणागती पत्करली असे त्यांचे समर्थक सांगत आहेत. आपल्याविरोधात खोटे आरोप करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपा व बहुजन समाज पक्षाच्या लोकांनी दंगल भडकावली,परंतु आम्हाला लक्ष्य करण्यात आले, असे सोम यांनी वार्ताहरांना सांगितले.
पोलिस महानिरीक्षकांनी सांगितले की, नूर सलीम हे बहुजन समाज पक्षाचे छरठावल येथील आमदार असून त्यांना हिंसाचार प्रकरणी मुझफ्फरनगर येथे अटक करण्यात आली.
तत्पूर्वी भाजप अध्यक्ष राजनाथ सिंग यांनी सांगितले की, दंगलग्रस्त मुझफ्फरनगर भागास भेट देण्यास आपल्याला परवानगी नाकारण्यात आली. दंगलग्रस्त लोकांच्या कुटुंबीयांना भेटण्याची आपली इच्छा होती. जिल्हा प्रशासनाने दौऱ्यास परवानगी नाकारल्याने सध्याच्या स्थितीत आपण तेथे जाऊ शकत नाही.
समाजवादी पक्ष राज्यात सत्तेवर आला की, ते दंगली भडकावतात, असा आरोप करून ते म्हणाले की, आमचे एक शिष्टमंडळ राष्ट्रपतींची भेट घेऊन त्यांना सध्याच्या दंगलग्रस्त परिस्थितीची माहिती देणार आहे.
आमदार सोम यांना व्हिडीओ फीत प्रकरणी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली. प्रक्षोभक भाषण करून दंगल भडकावल्याच्या प्रकरणी त्यांना दुसऱ्या न्यायालयात हजर केले जाणार आहे. भाजप आमदार राणा यांना प्रक्षोभक भाषणे केल्याने मुझफ्फरनगरच्या स्थानिक न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे. त्यांना अंतरिम जामीनही नाकारण्यात आला आहे. त्यांचा अंतरिम अर्ज फेटाळण्यात आला असून २४ सप्टेंबर ही जामीन अर्जाच्या सुनावणीसाठी पुढची तारीख देण्यात आली आहे. मुझफ्फरनगर न्यायालयाने बुधवारी १६ राजकीय नेते व सामाजिक नेते यांच्यावर अटक वॉरंट काढले होते, त्यात सोम, बसपा खासदार कादिर राणा, भाजप आमदार भारतेंदु सिंग, बसपा आमदार नूर सलीम व मौलाना जमील, काँग्रेस नेते सइदुझमान व बीकेयूचे नेते नरेश टिकैत यांचा समावेश होता.
भाजप, सपाची मुझफ्फरनगरमधून निवडणुकीची तयारी – रमेश
मुझफ्फरनगरमधील हिंसाचार नियंत्रणात ठेवण्यात उत्तर प्रदेश सरकारची अकार्यक्षमता स्पष्ट झाली, असे नमूद करून केंद्रीय ग्रामविकासमंत्री जयराम रमेश यांनी, राज्यातील सत्तारूढ सपा आणि भाजपने निवडणुकीची तयारी सुरू केली असल्याची, टीकाही केली. लोकसभेच्या निवडणुका २०१४ मध्ये होणार असून त्याची तयारी मुझफ्फरनगरपासून सुरू झाली, तेथील स्थिती हा सपा आणि भाजपने दाखविलेला ‘ट्रेलर’ होता, असे रमेश यांनी म्हटले आहे. उत्तर प्रदेशचे प्रभारी म्हणून अमित शहा यांची नियुक्ती केल्याने पुढील निवडणुका जातीयतेच्या आधारावर लढण्याचा भाजपचा हेतू स्पष्ट झाला, असेही ते म्हणाले. राज्यात जातीय दंगलींना अधिक खतपाणी घातले जाण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 22, 2013 2:34 am

Web Title: muzaffarnagar riots bjp mla sangeet som bsps noor salim rana arrested
Next Stories
1 माझ्यावरील आरोप खोडसाळपणाचे
2 छोटी शहरे जोडण्यासाठी १०० विमानतळे उभारणार
3 श्रीलंकेमध्ये तामिळबहुल भागात २५ वर्षांनी मतदान
Just Now!
X