मुझफ्फरनगर येथे २०१३ मध्ये झालेल्या दंगलीतील पीडित मुस्लीम आणि जाट कुटुंबीयांनी एकमेकांविरोधात खटले मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी या दंगलीतील जाट आणि मुस्लीम नेत्यांमध्ये मागील पाच दिवसांपासून चर्चा सुरू होती. चर्चेअंती ठरलेल्या फॉर्म्युलानुसार पाच गावातील दोन्ही समूह आणि पीडितांनी अखेर खटले मागे घेण्याचा निर्णय घेतला. वर्ष २०१३ मध्ये दंगलीमुळे गाव कुतबा, पुरबलियान, काकडा, हदोली येथील लोक सर्वाधिक प्रभावित झाली होती.

या समजोत्यातंर्गत पाच गावातील २९ खटले मागे घेण्यात येणार आहेत. या दंगलीत ६३ जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. तर ५० हजार हून अधिक लोक विस्थापित झाले होते. जाट नेता विपिन बालियान म्हणाले की, दिल्लीमध्ये मुलायमसिंह यादव यांच्या निवासस्थानी ज्याप्रमाणे निर्णय झाला, त्याप्रमाणे दंगलीतील सर्वाधिक प्रभावित झालेल्या पाच गावातील लोक रविवारी समजोत्यावर सहमत झाले. आता पुढील सुनावणीवेळी न्यायालयात शपथपत्र दाखल करण्यात येईल.

रविवारी बैठकीदरम्यान समाजवादी पक्षाचे खासदार अमीर आलम, आमदार नवाजिश आलम, बसपाचे माजी खासदार कादिर राणा आणि काँग्रेसचे माजी खासदार हरेंद्रसिंह मलिक हेही उपस्थित होते.

कुतबा गावात झालेल्या दंगलीत आपल्या आईला गमावलेला मोहम्मद हसन म्हणाला की, मीही मुलायमसिंह यांच्या निवासस्थानी चर्चेवेळी उपस्थित होतो. विपिन बालियान यांनी मला बोलावले होते. तिथे अनेक जाट आणि मुस्लीम नेते उपस्थित होते. त्यांच्या सहमती फॉर्म्युलाला मी होकार दिला आहे.