उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्य़ात मुझफ्फरनगरच्या दंगलीमुळे विस्थापित झालेल्या कुटुंबातील चार महिन्यांच्या एका मुलीचा थंडीने गारठून मृत्यू झाला. शामली जिल्ह्य़ातील कांढला या गावात ही घटना घडली असल्याचे पोलिसांनी सांगितले. अहसान असे या लहान मुलीच्या आईचे नाव असून ती मूळ मुझफ्फरनगरमधील बहवादी गावची आहे. दंगलीच्या वेळी त्यांना गेल्या महिन्यात मदत छावणीत आणले होते. नंतर या कुटुंबाला छावणीतून बाहेर काढण्यात आले व नंतर ही महिला कांढला या गावात एका झोपडीत राहात होती. तिथे तिच्या सुरय्या नावाच्या मुलीचा शुक्रवारी थंडीने गारठून मृत्यू झाला. या प्रकरणी कांढलाचे आरोग्य अधीक्षक रमेश चंद्र यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान काल शामली जिल्ह्य़ातील मलकापूर येथे पाच महिन्यांच्या मुलीचा मृत्यू झाला. मुझफ्फरनगर व शामली या दंगलग्रस्त जिल्ह्य़ातील जे दंगलग्रस्त मदत छावण्यात राहात होते त्यातील ३४ मुलांचा ७ सप्टेंबर ते २० डिसेंबर दरम्यान कडाक्याच्या थंडीने मृत्यू झाला आहे.