महाबळेश्वरनजीक पोलादपूर येथे शनिवारी बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करुन आपल्या शोक भावना व्यक्त केल्या आहेत.


पंतप्रधान ट्वीटमध्ये म्हणाले की, महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यात झालेल्या भीषण बस अपघातात अनेक लोक मृत्यूमुखी पडल्याच्या बातमीने दुःख झाले आहे. मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.

रायगड पोलादपूरच्या घाटात दापोली कृषी विद्यापीठाची बस दरीत कोसळली. या बसमध्ये ड्रायव्हरसह ३४ जण होते. यांपैकी ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. दापोलीवर या अपघातामुळे शोककळा पसरली आहे. यामधील बचावलेले एकमेव कर्मचाऱी प्रकाश सावंत यांनी बस कोसळत असताना बाहेर उडी घेतल्याने ते बचावले आहेत. यानंतर कसेबसे बाहेर येऊन त्याने अपघात झाल्याचे विद्यापीठात कळवले.

या अपघातात बसचा चेंदामेंदा झाला आहे. शनिवारी सकाळी १०.३० च्या दरम्यान बस सुमारे २०० ते ३०० फूट खोल दरीत कोसळली. हा घाट अत्यंत बिकट आहे. जिथे हा अपघात झाला ते ठिकाण अपघाताचे नाही, त्यामुळे नेमका अपघात कसा झाला ते समजू शकलेले नाही. बस जेव्हा कोसळली तेव्हा अनेकजण फेकले गेले आणि झाडांमध्ये अडकले असेही स्थानिकांनी म्हटले आहे.