द कपिल शर्मा मधून आऊट झाल्यावरही नवज्योत सिंग सिद्धू त्यांच्या वक्तव्यावर ठाम आहेत. माझा अहिंसेवर विश्वास आहे, चर्चेने प्रश्न सुटू शकेल असे मला आजही वाटते आहे. भारतावर झालेला हल्ला निषेधार्ह आहे मात्र गोळीला गोळीने उत्तर हा पर्याय नाही. चर्चेने हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली लागू शकतो असे नवज्योत सिंग सिद्धू यांनी म्हटले आहे. एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. जे जवान सीमेवर शहीद झाले त्या घटनेबद्दल मला अतीव दुःख झाले आहे. यासाठी जे दोषी आहेत त्यांना शिक्षा झालीच पाहिजे मात्र मूठभर लोकांसाठी तुम्ही संपूर्ण देशाला (पाकिस्तान) बदनाम ठरवू शकत नाही असं वक्तव्य त्यांनी पुन्हा एकदा केलं आहे.

पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर नवज्योत सिंग सिद्धू यांनी अशाच प्रकारची प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे त्यांना कपिल शर्मा शो मधून हटवा अशी मागणी करण्यात आली. ट्विटरवर बॉयकॉट सिद्धू हा हॅशटॅगही ट्रेंड करण्यात आला. मात्र नवज्योत सिंग सिद्धू हे त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. जवानांच्या ताफ्यावर हल्ला होतो तेव्हा त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची आहे? त्यांना असं ट्रकने आणि गाड्यांनी पाठवण्याऐवजी विमानाने का पाठवलं नाही? असेही प्रश्न सिद्धू यांनी उपस्थित केले आहेत. सगळा देश आज दहशतवादाविरोधात एकजूट करून उभा आहे ही अभिमानाची गोष्ट आहे. मात्र यामुळे आता कर्तारपूर कॉरिडॉरवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करणार का? असेही सिद्धू यांनी विचारले आहे. नवज्योत सिंग सिद्धू यांना कपिल शर्माच्या शोमधून कायमस्वरूपी हाकलण्यात आले आहे. आता ट्विटरवर #SackSidhuFromPunjabCabinet पंजाबच्या मंत्रिमंडळातून सिद्धूंना हाकला हा हॅशटॅग ट्रेंड होतो आहे.