माझे वडिल या देशासाठी जगले, देशासाठी त्यांनी मरण पत्करलं, हे सत्य ‘सेक्रेड गेम्स’ या कल्पक वेब सिरिजमधल्या पात्रांमुुळे बदलणार नाही असं टि्वट काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी केलं. नेटफ्लिक्सवरच्या ‘सेक्रेड गेम्स’ या वेब सिरिजमध्ये दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांची बदनामी करण्यात आली आहे. त्यामुळे नेटफ्लिक्स विरोधात न्यायालयात अनेक याचिका दाखल झाल्या आहेत.

‘सेक्रेड गेम्स’मधून दिवगंत पंतप्रधान राजीव गांधी यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप या याचिकांमधून करण्यात आला आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी टि्वट करुन आपली भूमिका स्पष्ट केली.

माझा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर विश्वास आहे. स्वातंत्र्य हा मूलभूत लोकशाही अधिकार आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर नियंत्रण ठेवले पाहिजे असे भाजपा आणि आरएसएसला वाटते असे राहुल गांधी म्हणाले. बुधवारी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेत ‘सेक्रेड गेम्स’ मधील काही दृश्य हटवण्याची मागणी करण्यात आली आहे. येत्या १६ जुलैला न्यायालय यावर सुनावणी करणार आहे.