आघाडी भक्कम असल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा; सरकारमध्ये अंतर्विरोध-भाजप

बंगळूरु : कर्नाटकमध्ये वेगाने राजकीय घडामोडी सुरू असतानाच काँग्रेसने १८ जानेवारीला विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली आहे. काँग्रेसने आपले आमदार फुटल्याचा प्रश्नच नसल्याचे स्पष्ट केले आहे. काँग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दलाचे सरकार पडू नये म्हणून काँग्रसच्या काही मंत्र्यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवल्याचे काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले. पक्षनेतृत्व पर्यायाच्या शोधात असल्याचे सूत्रांनी स्पष्ट

केले.

आमदारांची फोडाफोडी करून भाजप कुमारस्वामी सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. राज्यावरचे संकट लवकरच दूर होईल असा विश्वास मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी व्यक्त केला. तर सत्तारूढ आघाडी भक्कम असल्याचा दावा त्यांनी केला.

एका वृत्तानुसार किमान तीन ते पाच आमदार मुंबईत भाजप नेत्यांबरोबर असल्याचे वृत्त आहे. हा सारा प्रकार लाजिरवाणा असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी व्यक्त केली आहे. त्यांना जनतेने कौल दिलेला नाही तरीही सरकार अस्थिर करण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत, असा आरोप सिद्धरामय्या यांनी केला आहे. येडियुरप्पांचे वय झाले आहे मात्र मुख्यमंत्रिपदाची लालसा संपत नाही अशी प्रतिक्रिया सिद्धरामय्या यांनी व्यक्त केली.

सत्तारूढ जबाबदार -भाजप

’ सत्तारूढ आघाडीमधील घटक पक्षांना अंतर्गत एकी राखण्यात अपयश आले आहे. मात्र आमच्यावर ते खापर फोडत आहेत, असे प्रत्युत्तर भाजपने दिले आहे. सध्याच्या राजकीय अस्थैर्याला ही अनैसर्गिक युती जबाबदार आहे, असा आरोप भाजपचे प्रदेश सरचिटणीस सी. टी. रवी यांनी केला आहे. एकीकडे सरकार स्थिर आहे, असा दावा काँग्रेस नेते करतात तर दुसरीकडे आमच्यावर फोडाफोडीचा आरोप करतात, हे अनाकलनीय असल्याचे रवी यांनी स्पष्ट केले.

’ २२४ सदस्य असलेल्या कर्नाटक विधानसभेत भाजपचे १०४ काँग्रेसचे ७९, धर्मनिरपेक्ष जनता दलाचे ३७ तर बहुजन समाज पक्ष, केपीजेपी व अपक्ष प्रत्येकी एक सदस्य आहे.

आघाडी सरकारला धोका नाही – खरगे 

कर्नाटकमधील जनता दल (धर्मनिरपेक्ष) आणि काँग्रेस आघाडीच्या सरकारला कोणताही धोका नसल्याचा दावा काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी बुधवारी केला. सत्ताधारी पक्षांच्या ११८ आमदारांचा पाठिंबा कायम असून भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाला अजिबात यश मिळालेले नाही, असे त्यांनी म्हटले आहे. भाजपने कर्नाटकात यापूर्वीही ‘ऑपरेशन लोटस’ राबवले होते, तेव्हाही ते अपयशी ठरले. आता पुन्हा हीच मोहीम भाजपने आखली असून त्यासाठी काँग्रेसच्या आमदारांना सीबीआय, सक्तवसुली संचालनालयाच्या कारवाईची भीती दाखवली जात आहे. काँग्रेसचे १०-१५ आमदार संपर्कात असल्याच्या अफवा पसरवून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न भाजप करत आहे, असे खरगे म्हणाले.