गेली ५५ वर्षे सुरू असलेली आपली राजकीय कारकीर्द अजून संपलेली नाही असे सांगत ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी राजकारणात सक्रिय राहणार असल्याचे स्पष्ट केले.दीड महिन्यांनंतर अडवाणी यांनी ब्लॉगवर संघाशी असलेल्या संबंधांची आठवण केली आहे. वयाच्या १४ व्या वर्षी कराचीत संघ शाखेवर गेल्यावर जीवनाचा अर्थ कळाला असे अडवाणींनी स्पष्ट केले आहे. हा प्रवास गेली पंचावन्न वर्षे सुरू आहे. अडवाणी यांना राज्यसभेवर पाठवले जाईल अशी चर्चा सुरू असतानाच अडवाणी यांनी आपल्यातले सक्रिय राजकारण अजूनही संपलेले नाही असा इशाराच दिला आहे. अडवाणी यांनी खुशवंतसिंग यांच्या अलीकडेच झालेल्या भेटीचा संदर्भ दिला आहे. २ फेब्रुवारीला खुशवंत सिंग यांनी शंभराव्या वर्षांत प्रवेश केला आहे. या वयातही लिखाण करत असल्याबद्दल अडवाणी यांनी त्यांचे कौतुक केले आहे.