करोना विषाणूच्या प्रादुर्भावाशी लढत असताना सरकारने संपूर्ण देशभरात लॉकडाउन जाहीर केलं होतं. या लॉकडाउनमध्ये कायदा-सुव्यवस्था आणि विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या लोकांवर नियंत्रण ठेवण्याचं काम पोलीस यंत्रणेकडे होतं. मध्य प्रदेशात तर लॉकडाउन काळात पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ले होण्यच्या घटनाही समोर आल्या होत्या. यानंतर पोलीस कर्मचारी हळुहळु सुट्टी घेऊन आपल्या परिवारासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र मध्य प्रदेशातील रेवा येखील एका पोलीस कर्मचाऱ्याने वरिष्ठांकडे सुट्टीसाठी केलेला अर्ज पाहिल्यानंतर सर्वच आश्चर्यचकीत झाले आहेत.

रेवा येथील Special Armed Forces मध्ये कॉन्स्टेबल म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने सुट्टीसाठी अर्ज करताना, म्हशीची काळजी घ्यायची आहे असं कारण दिलं आहे. “गेल्या दोन महिन्यांपासून आईची तब्येत बिघडलेली आहे. याचसोबत माझ्या घरी एक म्हैस असून ती मला अत्यंत प्रिय आहे. ती आणि तिचं नुकतच जन्मलेलं रेडकू यांची काळजी घेण्यासाठी कोणीही नाहीये. यासाठी मला सहा दिवसांची सुट्टी हवी आहे.” पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या वरिष्ठांना असा अर्ज केला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

इतकच नाही तर या कर्मचाऱ्याने आपल्या अर्जामध्ये, “याच म्हशीच दूध पिऊल मी पोलीस भरतीची परीक्षा पास झालो. मी लहान असल्यापासून ती आमच्यासोबत आहे. तिचे माझ्यावर अनेक उपकार आहेत, ते फेडण्याची वेळ आली आहे. यासाठी मला सहा दिवसांची सुट्टी मंजूर करावी, जेणेकरुन मी माझ्या आईची आणि म्हशीची काळजी घेऊन त्यांची व्यवस्था करु शकेन”, असं म्हटलं आहे.