म्यानमारमध्ये गेल्या महिन्यात बंडाद्वारे सत्तेवर आलेल्या लष्कराविरुद्ध निदर्शने करणाऱ्या नागरिकांवर सुरक्षा दलांनी शनिवारी केलेल्या गोळीबारात किमान ४ जण ठार झाले.

चारपैकी तीन मृत्यू देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असलेल्या मंडालेत झाले, तर एक मृत्यू दक्षिण-मध्य भागातील प्याय शहरात झाला. दोन्ही ठिकाणी मृत आणि जखमी लोकांच्या छायाचित्रांसह समाजमाध्यमांवर वृत्त प्रसारित करण्यात आले

म्यानमारमधील सुरक्षा दलांनी आतापर्यंत किमान ७० लोकांना ठार मारले असल्याचे ‘विश्वासार्ह वृत्तांच्या’ आधारे कळले असल्याचे संयुक्त राष्ट्रांचे म्यानमारसाठीचे स्वतंत्र मानवाधिकार तज्ज्ञ टॉम अँड्र्यूज यांनी सांगितले आणि लष्कराने आंग सान सू की यांचे निर्वाचित सरकार हटवल्यापासून मानवतेविरुद्धचे गुन्हे वाढले असल्याच्या पुराव्यांचा त्यांनी दाखला दिला.

यांगून या म्यानमारच्या सर्वात मोठ्या शहरात शुक्रवारी रात्री तिघांना गोळ्या घालून ठार मारण्यात आल्याचेही समाजमाध्यमांवर म्हटले आहे. लोकांनी रात्री ८ वाजेनंतर रस्त्यावर येऊ नये यासाठी लागू करण्यात आलेल्या संचारबंदीचे नागरिक गेल्या आठवडाभरापासून उल्लंघन करत आहेत.