लोकशाहीवादी नेत्या आंग सान स्यू की यांनी कॅश आणि सोन्याच्या स्वरुपात लाच स्वीकारल्याचा आरोप म्यानमारच्या सैन्यानं केला आहे. आत्तापर्यंतचा त्यांच्यावरचा सर्वात गंभीर आरोप आहे. या प्रकरणात जर त्यांच्यावरचा आरोप सिद्ध झाला तर त्यांना १५ वर्षांसाठी तुरुंगवास भोगावा लागू शकतो.

समाजातली शांतता भंग केल्याप्रकरणी तसंच वॉकी-टॉकीची अवैधपणे आयात केल्याप्रकरणात त्यांच्यावर अजूनही ६ गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यांना अनेक दिवसांपासून नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. न्यायालयीन सुनावणीशिवाय इतर कुठेही त्या दिसलेल्या नाहीत.

आणखी वाचा- म्यानमारमध्ये सत्तापालट; आंग सान सू की यांच्यासह राष्ट्राध्यक्षांना अटक, लष्करानं सत्ता घेतली ताब्यात

लष्कराच्या परिषदेने गुरुवारी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की स्यू की यांनी लाच म्हणून 600,000 डॉलर्स स्विकारले होते. आधीच्या नागरी सरकारने – नॅशनल लीग फॉर डेमॉक्रसी (एनएलडी) – यांच्या जमिनीच्या सौद्यांमध्ये महत्त्वपूर्ण रक्कम गमावली, असा आरोपही यात करण्यात आला आहे.

स्यू की यांच्या व्यतिरिक्त इतर अनेक माजी अधिकाऱ्यांवर अशाच प्रकारचा भ्रष्टाचार आणि लाचखोरीचा आरोप करण्यात आला आहे. या आधी स्यू की यांच्यावर या आधीही गुप्त सरकारी बाबी उघड केल्याचा गंभीर आरोप झाला होता.

आणखी वाचा- म्यानमारमध्ये जबरदस्ती सत्ता ताब्यात घेणाऱ्या लष्कराला अमेरिकेने दिला इशारा

काही महिन्यांपूर्वी म्यानमारमध्ये लष्करानं सत्तापालट घडवून आणला असून सत्ता आपल्या हातात घेतली आहे. म्यानमारच्या लोकशाहीवादी सर्वोच्च नेत्या आंग सान सू की यांच्यासह देशाचे राष्ट्रपती विन म्यिंट आणि सत्तारुढ पक्षाच्या अन्य वरिष्ठ नेत्यांना लष्कराकडून अटक करण्यात आली होती. सत्ता ताब्यात घेतल्यानंतर लष्कराने देशात एका वर्षासाठी आणीबाणी जाहीर केली आहे. त्यामुळे लष्कराचे कमांडर इन चीफ मिन आंग ह्लाईंग यांच्या हाती सत्तेची सुत्रे आली आहेत.