नेपिताँ (म्यानमार) : म्यानमारच्या पदच्युत नेत्या आँग सान स्यू  ची यांच्या विरोधातील खटला पुढील सोमवारपासून लष्करी न्यायालयात सुरू होत आहे. लष्कराने आँग सान स्यू ची यांना फेब्रुवारीत अटक करून त्यांचे नवनिर्वाचित सरकार उलथून टाकले होते.

लष्करी बंडाला सार्वजनिक पातळीवर मोठा विरोध झाला होता. त्यानंतरचे काही महिने  तेथे सशस्त्र संघर्ष सुरू राहिला होता. सरकारी अभियोक्त्यांनी म्हटले आहे की, नेपिताँ येथील न्यायालयासमोर सादरीकरण करण्यास अजून अवकाश आहे कारण २८ जूनपर्यंत ते काम करायचे आहे.  सान स्यू ची यांच्यावर पाच आरोप ठेवण्यात आले असून त्यावर अभियोक्त्यांनी बाजू मांडल्यानंतर आँग सान स्यू ची यांच्या बचाव गटाला २६ जुलैपर्यंत मुदत मिळणार आहे. आँग सान स्यू ची यांच्यावर पाच आरोप ठेवण्यात आले असून  त्यांना २६ जून रोजी न्यायालयात हजर राहण्याचा आदेश देण्यात आला आहे, असे खिन माँग झॉ यांनी सांगितले.

सोमवार व मंगळवार असे दोन दिवस प्रत्येक आठवडय़ाला सुनावणी घेतली जाणार आहे. खिन माँग झॉव यांनी सोमवारी आँग सान स्यू ची व इतर दोन बचावकर्त्यांंची प्रक्रियात्मक सुनावणी घेतली. स्यू ची यांच्या समर्थकांनी सांगितले की, त्यांच्याविरोधातील आरोप हे लष्करी राजवटीला वैधता देण्याचा  प्रयत्न आहे. दोषी ठरल्यास एक ते दोन वर्षे  निवडणूक लढवता येणार नाही.