या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

म्यानमारमधून बेपत्ता झालेल्या सैन्यदलाच्या विमानाचे अवशेष समुद्रात आढळले आहेत. त्यामुळे या विमानात असलेले प्रवासी आणि क्रू मेंबर्स या सगळ्यांना जलसमाधी मिळाल्याची भीती व्यक्त होते आहे. एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार दवेईपासून २१८ किलोमीटर अंतरावर  समुद्रात या विमानाचे अवशेष सापडले आहेत. नौदल अधिकाऱ्यांनी सर्वात आधी या विमानाचे तुकडे पाहिले आणि त्यानंतर ही माहिती कळवली. ज्यामुळे बेपत्ता झालेल्या विमानाचे अवशेष मिळाल्याची माहिती मिळाली.  दुपारी १.३५ च्या दरम्यान या विमानाचा रडारसोबत असलेला संपर्क अचानक तुटला. त्यानंतर या विमानाचा शोध घेण्यासाठी नौदलाची चार जहाजे आणि वायुदलाची दोन विमानं रवाना झाली होती.  हे विमान मेयिक आणि यंगून या शहरांच्या दरम्यान १८ हजार फूट उंचीवरून उड्डाण करत होते. यंगून ही म्यानमारची आर्थिक राजधानी मानली जाते. यंगूनपासून २ तासांवर असलेल्या दवेई या ठिकाणी हे विमान बेपत्ता झाले. ज्यानंतर या विमानाचे अवशेष समुद्रात आढळून आले आहेत. वाय ८एफ-२०० हे सैन्यदलासाठी सामान वाहून नेणारे विमान होते. या  विमानात १०५ प्रवासी आणि ११ क्रू मेंबर्स होते. तसंच १०५ प्रवाशांमध्ये सुमारे १२ लहान मुलांचाही समावेश होता. या सगळ्यांना जलसमाधी मिळाली असल्याची शक्यता आहे.म्यानमारमध्ये सध्या पावसाळा सुरू आहे. मात्र विमान बेपत्ता झाले तेव्हा कोणत्याही प्रकारे हवामान ढगाळ किंवा खराब नव्हते. विमान समुद्रात कोसळण्याचे नेमके कारण काय हे अद्याप समोर येऊ शकलेले नाही.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Myanmar military plane carrying 116 missing
First published on: 07-06-2017 at 17:28 IST