आम्ही ‘न्यू इंडिया’ घडवत असून देशहितासाठी कठोर निर्णय घ्यायला घाबरत नाही. भ्रष्टाचार, दहशतवाद आणि गरिबीतून देशाला मुक्त करायचे आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे. म्यानमार ही पवित्र भूमी असून भारतातील स्वातंत्र्य चळवळ म्यानमारला वंदन केल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही असेही त्यांनी नमूद केले.

म्यानमार दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी यांगून येथे म्यानमारमधील अनिवासी भारतीयांशी संवाद साधला. मला म्यानमारमध्ये ‘मिनी इंडिया’चे दर्शन घडले असे सांगत मोदींनी भाषणाची सुरुवात केली. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी म्यानमारमधूनच भारताच्या स्वातंत्र्याचा नारा दिला होता. म्यानमारला वंदन केल्याशिवाय भारतातील स्वातंत्र्य चळवळ पूर्ण होऊच शकत नाही असे मोदींनी सांगितले. दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यावर आमचा भर असून म्यानम्यारच्या ४० मच्छिमारांना सोडण्याचा निर्णय घेतला आहे असे मोदींनी जाहीर केले. म्यानमार आणि भारत संबंधांमध्ये बौद्ध धर्म, व्यापार (बिझनेस), बॉलिवूड, भरतनाट्यम, बर्मा टीक हे पाच ‘बी’ महत्त्वाचे असतात असे मी वाचले होते. पण माझ्यामते यात आणखी एका ‘बी’चा समावेश केला पाहिजे. तो म्हणजे भरोसा (विश्वास) असे  म्हणत मोदींनी म्यानमारला भावनिक साद घातली.

मोदींनी भाषणात परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचेही कौतुक केले. सुषमा स्वराज या सक्रीय मंत्री असून जगभरातील भारतीयांना त्या नेहमीच मदत करतात असे त्यांनी सांगितले. भारताने जगाला ‘योग’ दिला, पण त्याचा प्रसार जगाच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या भारतीयांनीच केला असेही मोदींनी म्हटले आहे.