म्यानमारने रोहिंग्या मुस्लिमांना परत बोलवावे, असे आवाहन बांगलादेशचे राष्ट्रपती अब्दुल हमीद यांनी केले आहे. म्यानमारमध्ये हिंसाचार उसळल्यानंतर अनेक रोहिंग्या मुस्लिमांनी बांगलादेशचा आश्रय घेतला, आता त्यांनी म्यानमारमध्ये गेले पाहिजे. इतकेच नाही तर जगातील प्रत्येक संघटनांनी आणि देशांनी रोहिंग्या मुस्लिम त्यांच्या मायदेशी सुखरुप पोहोचतील आणि त्यांच्या हक्कांचे रक्षण होईल याची काळजी घ्यावी असेही हमीद यांनी सुचवले आहे.

रोहिंग्या मुस्लिमांना सहकार्य करा, असे आवाहन ढाकामधील रामकृष्ण मिशनच्या दुर्गा पूजेच्या कार्यक्रमाच्यावेळी हमीद यांनी केले. एएनआय या वृत्तसंस्थेने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

आठवड्याभरापूर्वीच बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी रोहिंग्या मुस्लिमांना म्यानमारने परत नेलेच पाहिजे अशी आक्रमक भूमिका घेतली होती. यासाठी म्यानमारवर आंतरराष्ट्रीय दबावाची आवश्यकता असल्याचेही म्हटले होते. बांगलादेशातील रोहिंग्यांना म्यानमारने परत न्यावे यासाठी आम्ही आमच्या परिने प्रयत्न करत आहोत असेही त्यांनी म्हटले होते. आता बांगलादेशच्या राष्ट्रपतींनीही याच गोष्टीचा पुनरुच्चार करत रोहिंग्या मुस्लिमांना म्यानमारने परत बोलावले पाहिजे असे म्हटले.