चीन सीमेलगतच्या प्रत्यक्ष ताबा रेषेजवळ लडाख क्षेत्रात अज्ञात उडते पदार्थ (यूएफओ) भारतीय लष्कराच्या जवानांना दिसले. तेथे असे उडते पदार्थ दिसण्याचे प्रकार नवीन नाहीत. मात्र हे अज्ञात उडते पदार्थ म्हणजे चीनची ड्रोन विमाने किंवा उपग्रह नसल्याचे अधिकाऱ्यांनी ठामपणे सांगितले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ४ ऑगस्टला लडाख भागातील लगान खेल भागात सायंकाळच्या सुमारास लष्कराच्या जवानांना हे अज्ञात उडते पदार्थ दिसले, त्यांनी लष्कराच्या मुख्यालयाला ही माहिती कळवली. गेल्या काही महिन्यात किमान १०० वेळा तरी असे अज्ञात पदार्थ प्रत्यक्ष ताबा रेषेवर दिसून आले आहेत. त्यानंतर बऱ्याच काळाने चार ऑगस्टला पुन्हा अज्ञात उडते पदार्थ दिसल्याची घटना घडली आहे.
लडाख क्षेत्रात लष्करी तुकडय़ांना अज्ञात उडते पदार्थ दिसल्याच्या बातम्यांबाबत संरक्षण मंत्री ए. के. अँटनी यांनी संसदेत असे सांगितले की, भारत-चीन सीमेवर अज्ञात उडते पदार्थ दिसत असल्याचे कुठलेही ठोस पुरावे नाहीत. एका वरिष्ठ विज्ञान संशोधन संस्थेच्या म्हणण्यानुसार, हे उडते पदार्थ म्हणजे प्रत्यक्षात गुरू आणि शुक्र हे ग्रह आहेत ते लडाखच्या उंचीवरील भागातून अधिक स्पष्ट दिसतात.