राजस्थानच्या अल्वर जिल्ह्य़ातील घटना
पेहलू खान बेदम मारहाण मृत्यू प्रकरणातील साक्षीदारांवर शनिवारी अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याची घटना घडली आहे.
पेहलू खान याच्या मुलाचाही साक्षीदारांमध्ये समावेश असून ते अल्वर जिल्ह्य़ातील बेहरोर शहर न्यायालयात साक्ष देण्यासाठी जात असताना हा हल्ला करण्यात आला, असे पोलिसांनी सांगितले.
पेहलू खान याचा मुलगा इर्शाद याने याबाबत नीमरण पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविल्यानंतर गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास सुरू करण्यात आला आहे. पेहलू खान याचे मुलगे इर्शाद आणि आरिफ, त्यांचे वकील हे बेहरोर न्यायालयात जात असताना काही अज्ञात इसम तेथे एसयूव्हीमधून आले आणि त्यांच्यावर गोळीबार केला, असे एफआयआरमध्ये म्हटले आहे. सदर एसयूव्हीवर नोंदणी क्रमांक लावण्यात आला नव्हता.
हरयाणातील आपल्या गावाकडे गुरे नेत असताना गोरक्षकांनी अल्वार जिल्ह्य़ात केलेल्या बेदम मारहाणीत पेहलू खान ठार झाला होता. पेहलू खान गाईंची तस्करी करीत असल्याचा जमावाला संशय आला होता.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 30, 2018 12:59 am