पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानात पहिल्या दहा शहरांमध्ये काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकातील तीन शहरांनी स्थान मिळवले आहे. म्हैसूरने पहिला क्रमांक पटकावला असून तेथे खुल्यावर शौचास बसण्याचे प्रकार नाहीत व मैल्याचे व्यवस्थापनही मानवी पातळीवर होत नाही. यात नवी मुंबईचा तिसरा क्रमांक लागला आहे. देशातील ४७६ शहरांचा यात विचार करण्यात आला होता. शहरी क्षेत्रात दिल्ली कॅन्टोन्मेंट (१५), नवी दिल्ली महापालिका (१६), दिल्ली महापालिका (३९८) याप्रमाणे क्रमवारी आहे. पश्चिम बंगालने चांगली कामगिरी केली असून त्यांची २५ शहरे पहिल्या शंभरात चमकली आहेत.
खुल्यावर शौचास बसणे, मैला व्यवस्थापन या मुद्दय़ांच्या आधारे सध्या या योजनेचे मूल्यमापन करण्यात आले आहे.दक्षिणेकडील ३७ शहरे पहिल्या शंभरात आली असून पूर्वेकडील २७ तर पश्चिमेकडील १५, उत्तरेकडील १२, ईशान्येकडील ७ शहरांचा पहिल्या शंभरात समावेश आहे. राजधानी असलेल्या २७ शहरांमध्ये केवळ १५ शहरांचा पहिल्या शंभरात समावेश झाला आहे. त्यातील पाच शहरे तीनशेच्या पुढच्या क्रमांकावर आहेत. बंगळुरू राजधान्यांमध्ये प्रथम पण शंभरात सातव्या क्रमांकावर आहे, तर पाटणा ४२९ व्या क्रमांकावर आहे. तळाकडील १०० शहरात उत्तरेकडील ७४, पूर्वेकडील २१, पश्चिमेकडील ३, तर दक्षिणेकडील २ शहरे आहेत. मध्य प्रदेशातील दामोह तळाला ४७६ क्रमांकावर आहे, तर त्याच्या आधी मध्य प्रदेशातील भिंड व हरयाणातील पालवाल व भिवानीचा समावेश आहे. चितोडगड (राजस्थान) बुलंदशहर (उत्तर प्रदेश), निमच (मध्यप्रदेश) रेवारी (हरयाणा) हिदाऊन (राजस्थान) संबळपूर (ओडिशा) यांचे क्रमांक त्यांच्या आधी आहेत.

पहिली दहा शहरे
’म्हैसूर (कर्नाटक)
’तिरुचिरापल्ली (तामिळनाडू)
’नवी मुंबई (महाराष्ट्र) ’कोची (केरळ)
’हासन (कर्नाटक) ’मंडय़ा (कर्नाटक) ’बंगळुरू ( कर्नाटक)
’तिरुअनंतपुरम (केरळ) ’हालीसहार (पश्चिम बंगाल)
’गंगटोक (सिक्कीम)

निवडीचे निकर्ष
या योजनेत वर्ग १ मधील ३१ राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील शहरांचे मूल्यमापन, मैलापाणी व्यवस्थापन, खुल्यावर शौचास जाणे, घनमैला व्यवस्थापन, सांडपाणी प्रक्रिया, पिण्याच्या पाण्याचा दर्जा, जलजन्य रोगांमुळे मृत्यू या मुद्दय़ांच्या आधारे करण्यात आली.