टाटा ग्रुपची उपकंपनी असलेल्या टाटा सन्स या कंपनीचे अध्यक्ष एन.चंद्रशेखरन आहेत. टाटा कन्सलटन्सी सर्विसेसमधून (टीसीएस) त्यांची याठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. टाटा सन्समध्ये रुजू झाल्यानंतर चंद्रशेखरन यांचा पगार किती वाढला याची तुम्ही आम्ही कल्पनाही करु शकणार नाही. २०१७-१८ या वर्षात त्यांचे पॅकेज जवळपास दुप्पट झाले आहे. त्यामुळे त्यांचा आताचा पगार ५५.११ कोटी रुपये आहे. विशेष म्हणजे या पगारातील ८५ टक्के रक्कम त्यांना कमिशन आणि नफा म्हणून मिळते. टाटा सन्सच्या वार्षिक अहवालातून ही माहिती समोर आली आहे. त्यामुळ ५६ वर्षांच्या चंद्रशेखरन यांचा पगार नक्कीच थक्क करणारा आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

मीठापासून ते सॉफ्टवेअर बनविण्यापर्यंत सर्व व्यवसायात असलेल्या टाटा ग्रुपचे वार्षिक उत्पन्न १०३ अरब डॉलर इतके आहे. फेब्रुवारी २०१७ मध्ये चंद्रशेखरन यांना कंपनीचे अध्यक्ष होण्याची संधी मिळाली. त्याआधी टीसीएसचे व्यवस्थापकीय संचालक असलेल्या चंद्रशेखरन यांना ११ महिन्यांसाठी ३०.१५ कोटी पगार होता. टाटा सन्सचे आधीचे अध्यक्ष असलेल्या सायरस मिस्त्री यांच्या तुलनेत चंद्रशेखरन यांचा पगार तिपटीने जास्त आहे. मिस्त्री यांना २०१६ मध्ये टाटा सन्सच्या बोर्डवरुन काढले तेव्हा त्यांचे वार्षिक पॅकेज १६ कोटी रुपये होते. मिस्त्री यांनी टाटा सन्सच्या नफ्यानुसार आपला पगार ठरवला होता. सायरस मिस्त्री आणि त्यांचे भाऊ शापूर मिस्त्री हे कंपनीचे सर्वात मोठे शेअर होल्डर आहेत. या दोघांकडे कंपनीचे १८.४ टक्के शेअर्स आहेत. टाटा ग्रुपला सांभाळणे ही मजेची गोष्ट नाही. त्यामुळे चंद्रशेखरन यांचा पगार योग्य आहे असे मत परदेशी ब्रोकरेज फर्ममध्ये इन्व्हेस्टमेंट अॅनालिस्ट म्हणून काम करणाऱ्या एकाने सांगितले.