जम्मू काश्मीर विधानभवनात संयुक्त सत्रामध्ये राष्ट्रगीत सुरू असतानाच गदारोळ झाल्याची टीका भाजपने केली आहे. पीडीपी-भाजप सरकारविरोधात विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मोठ्याने घोषणा दिल्या. त्यांच्या घोषणांमुळे राज्यपाल एन. एन. व्होरा यांनी आपले भाषण अर्ध्यातूनच सोडून दिले. त्यानंतर राष्ट्रगीत सुरू झाले तरी विरोधी पक्षाच्या आमदारांनी घोषणाबाजी सुरू ठेवली असा आरोप करीत त्यांच्या या कृत्याचा पीडीपी-भाजपने निषेध केला आहे. विरोधी पक्षाने माफी मागावी असे भाजप म्हणत आहे. राज्यपाल एन. एन. व्होरा यांनी प्रवेश करताच नॅशनल कॉन्फरन्स, काँग्रेस, सीपीआय (एम) आणि अपक्ष आमदारांनी हातामध्ये फलक धरले आणि घोषणाबाजीला सुरुवात केली. काही विरोधी पक्ष नेत्यांनी हातावर काळ्या पट्ट्यादेखील बांधल्या होत्या. जम्मू काश्मीरमध्ये गेल्या काही काळात जे मृत्यू झाले त्याला पीडीपी-भाजप सरकार जबाबदार असल्याचे त्यांचे म्हणणे होते. त्यांची घोषणाबाजी इतकी तीव्र होती की राज्यपालांना आपले भाषण तीनदा थांबवावे लागले.

आपल्या भाषणाच्या सुरुवातीला राज्यपालांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. जम्मू काश्मीरमध्ये शांती नांदावी यासाठी त्यांनी प्रार्थनादेखील केली. गदारोळ सुरू झाल्यानंतर त्यांनी आपले भाषण थांबवले. पुन्हा भाषण सुरू झाल्यानंतर पुन्हा गोंधळ सुरू झाला तेव्हा त्यांनी आपले भाषण आटोपते घेतले. जम्मू काश्मीरमध्ये भरपूर क्षमता आहे आणि येत्या काळात देशातील एक आघाडीचे राज्य म्हणून नावारुपाला येऊ शकते असे ते म्हणाले. जर आपण सर्व विरोध बाजूला ठेवून काम केले तर राज्य प्रगती करेल असे म्हणत त्यांनी आपले भाषण थांबवले. राष्ट्रगीताच्या वेळी गदारोळ करण्याचे कारणच काय असा प्रश्न भाजपचे आमदार रवींद्र रैना यांनी केला. याबाबत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी स्पष्टीकरण द्यावे रैना म्हणाला. आम्ही राष्ट्रगीताचा अपमान केला हा केवळ आमच्यावर करण्यात आलेला आरोप आहे असे नॅशनल कॉन्फरन्सचे देवेंद्र राणा यांनी म्हटले आहे. भारतीय जनता पक्ष आणि पीडीपीने राज्यात अराजक माजवले आहे असे राणा यांनी म्हटले. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना विरोधी पक्षाच्या नेत्यांना उद्युक्त केले असे ते म्हणाले. त्यामुळे भाजप-पीडीपीनेच माफी मागावी असे राणा म्हणाले.